शेतकरी, विद्यार्थी कामे घेऊन तलाठी कार्यालयाचे झिजवतात उंबरठे
कोल्हार | नगर सह्याद्री
महसूल खाते म्हटले की, सरकारी काम अन् वर्षभर थांब असाच काहीसा कारभार सध्या राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्दच्या तलाठी कार्यालयात पाहायला मिळत आहे,
कोल्हार खुर्द हे प्रवरा नदीच्या काठावर असलेले आणि नगर-मनमाड राज मार्गालगत असलेले गाव. या गावच्या तलाठी कार्यालयातून कोल्हार खुर्दसह रामपूरचा देखील महसूल कारभार पहिला जातो. सध्या शालेय विद्यार्थी यांचे अनेक प्रकारचे दाखले विद्यार्थ्यांना गरजेचे पडत असल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी वर्गाचे अनेक कामे तलाठी कार्यालयात अडकलेले असतात.
मात्र, इथले महसूल अधिकारी वेळेवर कार्यलयात उपस्थित राहत नसल्याने शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांमधून त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे. अनेक शेतकरी आणि शालेय विद्यार्थी आपली कामे घेऊन तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना तलाठी कार्यालयात कोतवाल (शिपाई) हजर असतात. या शिपायाला कुठलेही अधिकार नसल्याने तो शिपाई सामान्य शेतकरी आणि विद्यार्थ्यांची कामे करू शकत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना तलाठी भाऊसाहेबांच्या या बेजबाबदारपणाचा त्रास सहन करावा लागत आहे,
रात्रगस्तमुळे झोप होत नसल्याने वेळ मिळेना
महसूल विभागाकडे अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्याची प्रमुख जबाबदारी असल्यामुळे तलाठी यांना रात्रीच्या गस्त घालव्या लागतात.रात्रगस्त घातल्यामुळे झोप होत नाही आणि त्यामुळे तलाठी सकाळच्या कर्तव्यावर हजर राहत नसल्याचे बेजबाबदार उत्तर या अधिकऱ्यांकडून सामान्य नागरिकांना मिळत आहे.










