सूर्यानगर ते सनी हॉटेल रस्ता व पुलाच्या कामाचे भूमिपूजन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरामध्ये नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकासकामांची घोडदौड सुरू असून मुंबईच्या धतवर दर्जेदार रस्ते निर्माण करण्याचे काम केले जात आहे. पुढील 20 वर्षांचा विचार करून शहरातील विकासकामे माग लावली जात आहेत. नगरकरांनी दिलेल्या मतांच्या आशीर्वादामुळेच विकासकामांसाठी मोठा निधी आणणे शक्य झाले असून नागरिकांच्या सहकार्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात विकासाची गंगा पोहोचत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. पुढील वर्षापर्यंत अहिल्यानगरच्या नवीन एमआयडीसीमध्ये आणखी मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
प्रभाग क्रमांक दोन मधील सूर्यानगर ते सनी हॉटेलपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हभप श्रीनिवास महाराज घुगे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक महेश तवले, नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका रोशनी त्रिंबके, माजी नगरसेविका रूपालीताई वारे, गोविंद वाघ, राजेंद्र बुधवंत, महादेव दानवे, राहुल सांगळे, संपत नलवडे, दत्तात्रेय गावडे, एकनाथ चेमटे, वैभव ढाकणे आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शिड येथे डिफेन्स क्षेत्रातील मोठे युनिट उभारण्यात आले असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. पुढील वर्षापर्यंत अहिल्यानगरच्या नवीन एमआयडीसीमध्ये आणखी मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचा थेट फायदा शहरातील युवकांना रोजगाराच्या स्वरूपात होणार आहे. विकासकामांसोबतच बाजारपेठांची आर्थिक उन्नती आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सूर्यानगर परिसराला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दळणवळणासाठी जवळचा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच या रस्त्यावरील पुलाचे कामही माग लागल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक महेश तवले म्हणाले की, प्रभाग क्रमांक दोनमधील सूर्यानगर परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम माग लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मंजूर केले. तसेच या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठीही निधी मिळाल्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
माजी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले की, सूर्यानगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने हभप श्रीनिवास महाराज घुगे यांच्या मधुर वाणीतून श्रीराम कथाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. धार्मिक कार्यक्रमांमुळे सर्व जातिधर्मांतील नागरिक एकत्र येत विचारांची देवाणघेवाण करतात. त्यामुळे विकासकामांसोबत धार्मिकतेचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे कामही केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक निखिल वारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.










