विकासकामांच्या बैठकीवरून बीडमध्ये दोन्ही आमदार आमनेसामने
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड
बीड/ नगर सह्याद्री :
गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे. विकासकामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीवरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा ‘क्षीरसागर विरुद्ध पंडित’ असा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी स्थानिक राजकारणात या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड आणि गेवराईमधील 11 विकासकामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र आक्षेप घेतला. बीड मतदारसंघातील विकासकामांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, “बीड मतदारसंघ हा माझा आहे. दोन वेळा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आहे. विकासाच्या नावाखाली माझ्या मतदारसंघातील योजना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला तर मी त्याला विरोध करणारच.” बीडच्या विकासाशी तडजोड होऊ देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”
क्षीरसागर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार विजयसिंह पंडित म्हणाले, “मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक ही गेवराई मतदारसंघातील विकासकामांसाठी होती. त्याचबरोबर बीड नगर परिषदेच्या काही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. माझं बीडवर प्रेम उतू जाण्यापूर्वी बीडकरांचे माझ्यावर प्रेम उतू गेले आहे. बीडकरांनी मला कौल दिला आहे. मग त्या प्रेमाचा काहींना त्रास का होतो?”
या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. स्थानिक राजकारणात त्यांच्यातील संघर्ष सातत्याने चर्चेत असतो. विकासकामांच्या मुद्द्यावरून आता हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंडित यांनी क्षीरसागर यांच्या कुटुंबावरही अप्रत्यक्ष टीका केली. “तुमचे कुटुंब गेली तीन दशके नगरपालिकेत सत्तेत होते. मग 165 कोटी रुपयांच्या योजनेचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.










