- जाहिरात -spot_img
breaking news

गृहमंत्री अमित शाह यांची मंत्री विखे यांनी घेतली भेट…

अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा कलश सुपूर्त

लोणी | नगर सह्याद्री
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला. तसेच गोदा ते नर्मदा पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा कलश त्यांना सुपूर्त केला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यान मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेची माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिली. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. जलसंवर्धन, जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेचा संदेश देण्यासाठी तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील तीस खोऱ्यांतील जलकलशांचे यात्रेच्या निमित्ताने पूजन करण्यात आले. श्रीक्षेत्र महेश्वर येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची माहितीही या भेटीदरम्यान दिली. पूजन करण्यात आलेला जलकलश केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सुपूर्त केला.

वाढदिवसाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही मंत्री विखे पाटील यांना शुभेच्छा दिल्या. राज्यातील राजकीय, सामाजिक तसेच नागरी प्रश्नांवर या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री विखे पाटील यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री शंभूराज देसाई, यांच्यासह सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व अनावश्यक खर्चांना फाटा देऊन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कार्यकर्त्यांनी संकलित केले आहे.

हे सुद्धा वाचा :  सुगंधित तंबाखूसह कार जप्त; आरोपी फरार

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्रीमती गंगूबाई विखे पाटील सभागृहात मोठ्या प्रमाणात वह्या, पुस्तके, दप्तर, शाळांसाठी संगणक, डिजिटल बोर्ड आणि इतर शैक्षणिक साहित्य सामाजिक बांधिलकीने उपलब्ध करून देण्यात आले आहे.बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पायरेन्स संस्थेच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीने नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचारांची उपलब्धता करून देण्यात आली होती. प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांनीही सामाजिक उपक्रमातून मंत्री विखे पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ