केबल चोरीप्रकरणी उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी तलाव परिसरातील इलेक्ट्रिक केबल, मोटार पंप व इतर साहित्य चोरी प्रकरणी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असून पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तलाव परिसरातून वारंवार केबल, मोटार, स्टार्टर व इतर साहित्य चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी देऊनही चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान, काल उपोषणस्थळी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आंदोलनादरम्यान आराध्य गीतांच्या माध्यमातून श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या कामकाजावर टीका करण्यात आली. या गीतांमधून चोरी प्रकरणातील तपासातील दिरंगाई, पोलिस प्रशासनाची निष्क्रियता आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.उपोषणकर्त्यांनी चोरी प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, चोरीचा तपास जलदगतीने पूर्ण करावा आणि शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने लवकर दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये अनिल ठवाळ, राजेंद्र मस्के, नंदकुमार ताडे, अरविंद कापसे, नंदकुमार ससाने, श्याम झरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनिल औटी, दादा औटी, संतोष औटी, आनंद औटी, रंगनाथ सप्रे, दीपक आमले, आबा औटी, धनंजय औटी व शेतकरी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










