शेवगावच्या गणेश जगदाळे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
शेवगाव | नगर सह्याद्रीकृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), दहिगाव-ने (ता. शेवगाव) यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे सुलतानपूर (मठाचीवाडी) येथील प्रगतशील शेतकरी गणेश कडूबाळ जगदाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘अँस्पी एल.एम.पटेल फार्मर ऑफ द इयर अवॉर्ड 2024’ जाहीर झाला आहे.
सोयाबीन पिकाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खरीप 2024 मध्ये संपूर्ण भारतातून या पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया राबवण्यात आली होती. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जगदाळे यांचे नामांकन पाठवण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात शेतीकामांचा 30 मिनिटांचा व्हिडिओ पाठवून वरिष्ठ शास्त्रज्ञांनी त्याची तपासणी केली. जगदाळे यांनी एकरी 20 क्विंटल सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेत संपूर्ण देशात सर्वोत्तम कामगिरी केली. नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, सोयाबीननंतर ऊस लागवड केल्यास उसाचे एकरी 60 टन उत्पादन सहज मिळते आणि जमिनीची सुपीकताही टिकते, असा यशस्वी अनुभव गणेश जगदाळे यांनी यावेळी व्यक्त केला. या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याहस्ते जगदाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कृषिविज्ञान केंद्रामुळे शेतकऱ्यांना फायदा
केव्हीके दहिगाव-ने मुळे लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे स्वप्न साकार होत असून, केंद्राचे लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळत आहेत.
– चंद्रशेखर घुले,माजी आमदार










