विधान परिषद निवडणुकीत पडद्याआड अशी केली गेली कुरघोडी | विखे पाटलांनी विरोधकांसह स्वकीयांनाही दिली धोबीपछाड
इनसाईड स्टोरी / शिवाजी शिर्के
विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृृष्ण विखे पाटलांना विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत स्वकीयांनीच घेरले होते. दत्ता पानसरे हे विखे पाटलांचे उमेदवार आहेत आणि त्यांनीच त्यांना उमेदवारी करण्यास लावले अशी आवई सोयीस्करपणे उठविण्यात आली होती. पानसरे यांची उमेदवारी राहिली असती तर त्यांना जास्तीचे मतदान देऊन प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करण्यापर्यंत व्युहरचना आखली गेली होती. त्यातून विखे पाटलांनी पक्षाशी गद्दारी केली, पक्षाने दिलेला उमेदवार विखे पाटलांनी पाडला असा त्यांच्यावर ‘आळ’ आला असता आणि त्यातूनच पुढे मग विखे पाटलांबद्दल पक्षश्रेष्ठींकडून नाराजीचा सुर निघाला असता. स्वकीयांकडून दिल्लीपर्यंत तक्रारी आणि त्यातून मोठे महाभारत झाले असते. या साऱ्याची चाहूल लागताच विखे पाटलांनी संयमाने परिस्थिती हाताळली आणि विनायक देशमुख या विश्वासू सहकाऱ्याला थेट जबाबदारी देत पानसरे यांच्या अर्जाचा निकाल लावून टाकला.
विधान परिषदेसाठी भाजपाकडून प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचवेळी विरोधकांचा उमेदवार ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. श्रीरामपूरमधून करण ससाणे यांचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर आघाडीकडून राणीताई लंके यांचे नाव चर्चेत आले. राणीताई लंके यांच्या नावावर खलबते सुरू झाली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला मतांची मोठी रसद देणाऱ्या नेत्याने विरोध केला. त्यानंतर त्यांनी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यानच्या कालावधीत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या दत्तात्रय पानसरे यांच्यासाठी विरोधक आणि विखे पाटलांचे पक्षांतर्गत विरोधक एकवटले. पानसरे यांचा अर्ज मागे निघू नये याची काळजी घेण्यात आली आणि नगर शहरात आलेल्या पानसरे यांना नगरमधून बाहेर जाण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यानुसार पानसरे नगरच्या बाहेर जाण्यास निघालेही! प्राजक्त तनपुरे यांच्या विजयाची जबाबदारी स्वत: विखे पाटलांनी घेतली होती. मात्र, तनपुरे यांची निवडणूक सहजासहजी पार पडू द्यायची नाही आणि पानसरे यांना रसद देऊन तनपुरेंच्या आडून विखे पाटलांची कोंडी करण्याचा डाव आखला गेला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मज आणि गुडबुकमध्ये असणारा जिल्ह्यातील बडे प्रस्थ पानसरे यांच्या उमेदवारीसाठी पडद्याआड सुत्र हालवत होते. याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक बडा नेता देखील प्राजक्त तनपुरे यांचा जुना हिशोब चुकविण्यासाठी सज्ज झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, सुजित झावरे यांच्यासह अन्य दोघांनी पानसरे यांना शिंदे सेनेची ताकद मिळावी यासाठी हालचाली केल्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी पानसरे यांना पाठींबा देण्याचा प्रस्ताव सपशेल फेटाळला.
भाजपाकडे तनपुरे हे सहज विजयी होतील असे मतदान असताना पानसरे यांच्या पारड्यात आपल्याकडील मते टाकायची आणि विखे पाटलांची मते पानसरे यांना मिळाली असा कांगावा करण्याची चाल पडद्याआड खेळली गेली. राजकीय मुत्सद्देगिरी आणि समयसुचकता अचुकपणे हेरणाऱ्या विखे पाटलांच्या हे लक्षात आले. प्राजक्त तनपुरे यांचे काय होईल याहीपेक्षा आपल्या विरोधात मोठा डाव खेळला जात असल्याचे त्यांनी हेरले. यानंतर विखे पॅटर्नच्या हालचाली सुरू झाल्या.
विळद घाटातून एक गाडी थेट मुुकुंदनगरमध्ये गेली आणि तीच गाडी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. त्यावेळी तीन वाजण्यास म्हणजेच अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यास अवघे पाच मिनिटे बाकी होते. अत्यंत गंभीर चेहऱ्याने विनायक देशमुख आणि त्यांच्यासोबत आणखी एक जण असे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आले. मिडीयासह कोणालाच त्यात विशेष वाटले नाही. दोन मिनिटात विनायक देशमुख आणि ती व्यक्ती बाहेर पडली. त्यानंतर पानसरे यांचा अर्ज मागे घेतला गेल्याचे तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त बाहेर आले. देशमुख यांच्यासोबत आत गेलेली आणि बाहेर आलेली ती व्यक्ती होती उमेदवार दत्ता पानसरे यांचे सुचक! सुचकानेच आपणास प्राधिकृत केले असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आणि पानसरे यांचा अर्ज बाहेर पडला.
शेवटच्या मिनिटात विखे पाटलांनी जे काही करुन दाखवले, त्याने स्वकीयांसह विरोधकही हादरले. त्यानंतरही पानसरे यांचा अर्ज कायम राहिला पाहिजे यासाठी मोठ्या हालचाली झाल्या. काहींनी त्या पडद्यासमोर केल्या तर काहींनी त्या पडद्याआड राहून केल्या. रात्री उशिरापर्यंत पानसरे यांना संयमाने हाताळण्यातही विखे पाटील यांचाच वाटा राहिला. मात्र, या संपूर्ण प्रक्रीयेत जो काही त्रास झाला त्याचा वचपा काढणार नाही ते विखे पाटील कसले!
अपक्ष अर्ज दाखल केलेले दत्ता पानसरे हे विखे पाटलांचे कधीकाळी समर्थक राहिलेले. या निवडणुकीत विखे पाटलांनी पक्षाने उमेदवारी दिलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. दत्ता पानसरे यांची उमेदवारी दाखल झाल्याच्या दिवसापासून ते शेवटपर्यंत त्यांची उमेदवारी कायम राहील यासाठी विखे पाटलांच्या विरोधकांनी कंबर कसली. त्यात विरोधक देखील सहभागी होतेच. पानसरे यांनी शेवटी माघार घेत असल्याचे जाहीर करण्यापूव काही अटी घातल्या. त्यात राज्य पणन संघाचे अध्यक्षपद कायम ठेवणे, बारदाना खरेदीचे अधिकार संघाकडे ठेवणे, संघात नव्याने सभासद करण्यात आलेल्या 132 संस्थांचे सभासदत्व कायम ठेवणे या प्रमुख तीन अटी होत्या. त्या मान्य असल्याचे पानसरे यांना सांगण्यात आले. मात्र, पुढच्या 48 तासात विखे पाटलांनी दणका दिला आणि पानसरे यांना संघातून पायउतार केले. नव्याने सभासद करण्यात आलेल्या संस्थांचे सभासदत्व देखील रद्द करण्यात आले. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने विखे पाटलांना घेरुन त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लावण्यात सरसावलेल्या त्यांच्याच पक्षांतर्गत विरोधकांना त्यांनी मोठी धोबीपछाड दिली हे नक्की!










