- जाहिरात -spot_img
breaking news

तलवारीने हल्ला, सेवानिवृत्ताची ५ लाखांची फसवणूक, एमआयडीसीत राडा, तरुणीच्या वादातून हल्ला, कुठे काय घडलं पहा..

 

फिर्यादीच्या कुटुंबाला घरात कोंडून जिवे मारण्याची धमकी
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहर परिसरातील निर्मलनगर भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी फिर्यादीच्या महिला नातेवाईकांना घरात कोंडून जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश बाळू कांबळे हे पाऊलबुध्दे शाळेसमोर उभे असताना आरोपी नामदेव सिताराम कांबळे, वैभव शहाजी कांबळे, शुभम शहाजी कांबळे आणि अक्षय शहाजी कांबळे हे चारचाकी वाहनातून हातात तलवारी घेऊन त्या ठिकाणी आले. फिर्यादी हा त्यांच्या मित्रासोबत का राहतो, या कारणावरून आरोपींनी वाद घातला. यावेळी आरोपींनी तलवारीने फिर्यादीच्या खांद्यावर आणि डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच त्यांचा भ्रमणध्वनी फोडून नुकसान केले.

​दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला धक्का देऊन ‘पोलीस तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. यावेळी लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादीच्या पायाला इजा पोहोचवण्यात आली. विशेष म्हणजे, या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या आई आणि बहिणींना आरोपींनी त्यांच्या घरात १५ मिनिटे कोंडून ठेवले. ‘पुढच्या वेळी महेशला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी दहशत निर्माण केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत.

प्लॉटच्या बहाण्याने सेवानिवृत्ताची ५ लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त व्यक्तीला तब्बल ५ लाख ५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने आळंदी येथील प्लॉट दाखवून हा व्यवहार केला होता.

​अर्जुन ग्यानुजी कांबळे (वय ६७, रा. यशोदा नगर, पाईपलाईन रोड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. कांबळे यांच्या ओळखीचा अविनाश दिलीप घोजगे (रा. तळेगाव दाभाडे, जि. पुणे) हा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. कांबळे यांनी प्लॉट घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर घोजगे याने त्यांना आळंदी येथे एक जागा दाखवली. तो प्लॉट पसंत पडल्यानंतर बुकिंगसाठी ५ लाख रुपये देण्याचे ठरले. कांबळे यांनी विश्वासाने वेळोवेळी बँक खाते आणि गुगलपेद्वारे एकूण ५ लाख ५ हजार रुपये आरोपीच्या खात्यावर वर्ग केले.

हे सुद्धा वाचा :  बिअर बार फोडणारी गँग जेरबंद; ५ गुन्हे उघड, ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, कुठे घडला प्रकार पहा

​पैसे मिळाल्यावर आरोपीने ना प्लॉट दिला, ना घेतलेली रक्कम परत केली. वारंवार मागणी करूनही घोजगे टाळाटाळ करत असल्याने कांबळे यांनी पोलिसांत धाव घेतली. अर्जाच्या चौकशीनंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सहायक पोलीस निरीक्षक गोंटला या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हिशोबाच्या वादातून एमआयडीसीत राडा; लाकडी फळीने मारहाण करत कार्यालयाची तोडफोड
​अहिल्यानगर: एमआयडीसी परिसरातील श्रेया इंडस्ट्रीज कंपनीमध्ये हिशोबाच्या कारणावरून वाद होऊन एकाच कुटुंबातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी फळीने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत संशयितांनी कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड करत नुकसान केले असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​बापूसाहेब नारायण गाडेकर (वय ६२, रा. कजुर्ने खारे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी रामदास किसन गडकर, निलेश रामदास गडकर आणि शुभम रामदास गडकर (सर्व रा. शिर्डी, ता. राहता) हे एमआयडीसीतील श्रेया इंडस्ट्रीज कंपनीत आले होते. “आमचा हिशोब आताच्या आता द्या,” अशी मागणी त्यांनी गाडेकर यांच्याकडे केली. त्यावर गाडेकर यांनी “तुमचा काय हिशोब झाला आहे तो दाखवा,” असे म्हटले. या साध्या विचारणेचा राग अनावर झाल्याने संशयितांनी गाडेकर यांच्यासह त्यांचा मुलगा संदीप, पत्नी आणि नातू सुरज यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

​वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तिन्ही संशयितांनी गाडेकर कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी निलेश गडकर याने लाकडी फळीने सुरज याच्या पाठीवर प्रहार केला. संशयितांनी एवढ्यावरच न थांबता कार्यालयातील टेबल आणि केबिनच्या काचा फोडून नुकसान केले. या गोंधळात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी कोठेतरी पडून गहाळ झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

​अहिल्यानगर: शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. सोनानगर चौक परिसरातील बारस्कर मळा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा :  सुजित झावरे विधान परिषद निवडणुकीसाठी थेट मैदानात... कोणाला दिले आव्हान

​उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस नाईक हेमंत जबाजी खंडागळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिराज विलास दोमल (रा. बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर) हा या हुक्का पार्लरचा मालक असून, तो बेकायदेशीरपणे हे केंद्र चालवत होता. छाप्यात मोहम्मद सत्तार अन्सारी (रा. रांची, झारखंड) हा तरुण हुक्का पिताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून काचेचे पॉट, चिलीम, हुक्का पाईप, चिमटा आणि विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य फ्लेवर्स असा एकूण ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रणजीत बारगजे आणि संजीवनी नेटके यांनी ही कारवाई पूर्ण केली. शहरात अशा प्रकारे अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कौटुंबिक वादातून सेवानिवृत्त व्यक्तीवर चाकू आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला; पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील नालेगाव भागातील म्युन्सिपल कॉलनी येथे कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत एका सेवानिवृत्त व्यक्तीवर त्याच्याच पत्नीने, मुलाने आणि सासरच्या मंडळींनी मिळून चाकू व लाकडी दांडक्याने गंभीर हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कर्नया खरारे हे नालेगाव परिसरात वास्तव्यास आहेत. २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घरात ‘तक्रार का केली’ या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी संगनमत करून घरात प्रवेश केला आणि संतोष खरारे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांचा मुलगा वेदांत खरारे याने चाकूने त्यांच्या हातावर आणि पायावर वार करून जखमी केले. याच वेळी सासरे रतन सोळंकी यांनी लाकडी दांडक्याने संतोष यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना रक्तबंबाळ केले.

​या मारहाणीत पत्नी रिना खरारे आणि सासू सिमा सोळंकी यांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच सर्वांनी मिळून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी संतोष खरारे यांना उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
​या घटनेबाबत संतोष खरारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी रिना संतोष खरारे, वेदांत संतोष खरारे (दोघे रा. अहिल्यानगर), रतन मन्नू सोळंकी आणि सिमा रतन सोळंकी (दोघे रा. दौंड, जि. पुणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३३३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश चव्हाण करत आहेत. शहरातील वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा :  मनपाच्या पाणी, भुयारी गटार योजनेसाठी १ हजार कोटींच्या कर्जाचा आरोप तथ्यहीन, आयुक्त काय म्हणाले पहा

तरुणीच्या वादातून मोबाईल शॉपी चालकावर चाकू व बंदुकीने हल्ला; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
​अहिल्यानगर: चुलत बहिणीला परत आणल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या साथीदारासह मोबाईल शॉपी चालकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बालिकाश्रम रस्त्यावर घडली. या हल्ल्यात आरोपीने फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले असून, बंदुकीचा धाक दाखवून संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय मच्छिंद्र आगरकर यांची बालिकाश्रम रोडवर शिवम कम्युनिकेशन नावाची मोबाईल शॉपी आहे. आगरकर यांच्या चुलत बहिणीला आरोपी अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. बोल्हेगाव) हा घेऊन गेला होता. मात्र, फिर्यादीने तिची समजूत काढून तिला परत आणले होते. याच कारणावरून आरोपी अनिल गायकवाड हा एका अनोळखी मुलासह फिर्यादीच्या दुकानावर आला. “तुझ्या बहिणीला माझ्याकडे आणून सोड, तिच्या मालमत्तेवर माझा हक्क आहे,” असे म्हणत आरोपीने अक्षय यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

​वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपीने अक्षय यांच्या हातातील मोबाईल हिसकावून तो जोराने जमिनीवर फेकून फोडला. त्यानंतर जवळ असलेल्या चाकूने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करून दुखापत केली. इतक्यावरच न थांबता, आरोपीने बंदूक काढून तिच्या पाठीमागच्या भागाने अक्षय यांच्या मानेवर मारहाण केली. “माझ्या नादी लागला तर तुला आणि तुझ्या खानदानाला गोळ्या घालून मारून टाकीन,” अशी धमकी देत आरोपीने फिर्यादीच्या चुलत्यांनाही संपवण्याची भाषा केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भोंवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ