राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी विद्याथनींना घरी घेऊन सोडण्यासाठी निघालेले एका शाळेचा बसला भीषण अपघात झाला. बसचे स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्यालगत असलेल्या सुमारे दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात उलटली. या दुर्घटनेत 15 ते 20 विद्यार्थ्यांनी जखमी झाल्या असून त्यापैकी 4 ते 5 विद्यार्थिनींच्या डोक्याला हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
राहुरी येथील भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयाची शाळा सुटल्यानंतर शाळेचा बस चालक हे तांदूळवाडी कोंढवड आणि शिलेगाव परिसरातील सुमारे 30 ते 35 विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बस घेऊन निघाले. रेल्वे स्टेशन ते तांदुळवाडी या मार्गावर बस येत असतानाच अचानक स्टेअरिंगचा रॉड तुटला. त्यामुळे बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन खोल खड्ड्यात उलटली.
बस उलटताच विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक विद्यार्थ्यांनी बसमध्ये अडकून पडल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील युवक आणि नागरिकांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. आणि बस मधील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमी विद्यार्थिनींना तातडीने राहुरी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील पालकांनी चिंतेने घटनास्थळी धाव घेऊन आपल्या मुलींची विचारपूस केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली.










