अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. वारुळवाडी परिसरातील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेला आणि त्यांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि त्यांची पुतणी काल दुपारी पावणे चारच्या सुमारास हॉटेलच्या पाठीमागील रस्त्यावरून जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. आरोपींनी दोघींनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यास भाग पाडले.
या लुटीमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पळवून नेले असून, त्याची बाजारपेठ किंमत साधारण दीड लाख रुपये इतकी आहे. चोरी केल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून तातडीने पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेसमोर विद्यार्थ्याला मारहाण व जिवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर: रस्त्याच्या वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अडवून त्याला अश्लील शिविगाळ करत चापटीने मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर महानगरपालिकेसमोर घडली आहे. “जास्त बोलला तर काट डालुंगा” अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यश बाबासाहेब सानप (वय २१, रा. वसंत टेकडी) हा तरुण आपल्या चारचाकी वाहनाने डीएसपी चौकाकडे जात होता. पावन गणपती मंदिराजवळ मुकुंदनगरमधून एक वाहन आडवे आल्याने वाद झाला होता. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने “हा माझ्या बापाचा रस्ता आहे” असे म्हणून वाद घातला. त्यानंतर यश हा पुन्हा आपल्या घराकडे जात असताना आरोपी इम्रान सय्यद व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी त्याला महापालिकेसमोर अडवले.
येथे आरोपींनी यश याला अत्यंत खालच्या भाषेत शिविगाळ केली आणि त्याच्या कानशिलात लगावली. “तू जर जास्त बोलला तर तुला खलास करून टाकू,” अशी धमकीही यावेळी देण्यात आली. या प्रकारानंतर घाबरलेल्या यश सानप याने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी इम्रान सय्यद व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दारू पिण्यास नकार दिल्याने मजुरास बेदम मारहाण; सावेडीतील घटना, तिघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: सावेडी उपनगरातील डी-मार्ट समोरील मोकळ्या मैदानात दारू पिण्याच्या कारणावरून एका तरुणाला दगड आणि लाकडी फळीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम भाऊसाहेब थोरात या २८ वर्षीय मजुराने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शुभम थोरात हा पद्मावती टी-पॉईंट परिसरातील मोकळ्या मैदानात होता. त्या ठिकाणी आरोपी ओमकार गंजी, सोनू भाई आणि एका अनोळखी व्यक्तीने शुभमला दारू पिण्यासाठी आग्रह धरला. शुभमने दारू पिण्यास नकार दिला असता, आरोपींनी त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.
आरोपींनी शुभमला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत “तू जर दारू पिणार नाहीस, तर तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर रागाच्या भरात ओमकार गंजी व त्याच्या साथीदारांनी जवळच पडलेला दगड आणि लाकडी फळी शुभमच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार दीपक गांगर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तपोवन रोडवर तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील तपोवन रोड परिसरातील साईनगर येथे जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत विशाल बाळू शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या चुलत भावालाही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल शिंदे (वय २२) हा तपोवन रोडवरील साईनगर भागात राहतो. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो घराच्या पाठीमागील मैदानावर असताना आरोपींनी त्याला गाठले. यावेळी आकाश संजय पवार (रा. भिंगार), संतोष भानुदास शिंदे, गणेश दामू धोत्रे, गौरव भानुदास शिंदे (तिघे रा. तपोवन रोड) आणि विशाल गायकवाड (रा. पाईपलाईन रोड) यांनी जुन्या कारणावरून विशालला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी विशालवर लोखंडी रॉडने प्रहार केले. यावेळी विशालचा चुलत भाऊ विजय शिंदे हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता, आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर जखमी विशालला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, महिला पोलीस हवालदार संजीवनी नेटके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ट्रक दुरुस्तीच्या पैशांवरून चिचोंडी पाटील येथे राडा
लोखंडी गजाने मारहाण करत तरुणाला जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर: ट्रक दुरुस्तीसाठी घेतलेले एक लाख रुपये परत करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात चौघांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला लोखंडी गजाने व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना चिचोंडी पाटील येथे घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत परसराम हजारे हा तरुण आपल्या मित्रासह गावातील नदीच्या पुलावरून जात असताना ही घटना घडली. आरोपी देविदास मोहन हजारे, अंगद मोहन हजारे, मोहन दत्तु हजारे आणि विमल मोहन हजारे यांनी अनिकेतला अडवून ट्रक दुरुस्तीसाठी दिलेले एक लाख रुपये त्वरित परत मागितले. त्यावर “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, १५ ते २० दिवसात देतो,” असे अनिकेतने सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रागाच्या भरात आरोपी देविदास हजारे याने अनिकेतवर लोखंडी गजाने हल्ला केला, तर अंगद हजारे याने अनिकेतचा मित्र तुकाराम भोस याच्या पाठीत दगड मारून दुखापत केली. या सर्व आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धनवडे पुढील तपास करत आहेत.
बोल्हेगाव फाटा येथे तरुणाला मारहाण; ओम नरेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: बोल्हेगाव फाटा परिसरातील नम्रता हॉटेलजवळ एका तरुणाला अडवून त्याला लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ओम नरे आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनव सुरेश नवगिरे (वय २५, रा. बोल्हेगाव फाटा) हा तरुण आपल्या खोलीवरून मित्राच्या घरी जात होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तो नम्रता हॉटेलजवळ पोहोचला असता, एका दुचाकीवरून ओम नरे आणि त्याचे दोन साथीदार तिथे आले. त्यांनी अभिनवला विनाकारण अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी आणि सोबत आणलेल्या लोखंडी वस्तूने गंभीर मारहाण केली. मारहाण करत असतानाच आरोपींनी अभिनवच्या शर्टच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन तिथून पळ काढला.
या घटनेनंतर जखमी अवस्थेत अभिनवने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी ओम नरे व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
टॉवरमध्ये केबल चोरणारा रंगेहात जेरबंद
अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामरगाव शिवारात मोबाईल टॉवरमधील तांब्याची केबल चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. भगवान वसंत वांढेकर (रा. राघुहिवरे, पाथर्डी, हल्ली रा. नागापूर एमआयडीसी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मारुती सूर्यभान देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती देवकर हे चास येथे झोपलेले असताना त्यांना रात्रीच्या वेळी कॉल सेंटरमधून भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. मानभाववाडी कामरगाव शिवार येथील मोबाईल टॉवरच्या कक्षाचा दरवाजा उघडला गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार देवकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर त्यांना कक्षाच्या आत एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसून आले.
फिर्यादींनी प्रसंगावधान राखत कक्षाचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तातडीने नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता, आरोपी भगवान वांढेकर याने इलेक्ट्रीक बॅटरीच्या कटरच्या साहाय्याने तांब्याच्या ४० फुटी ८ केबलचे तुकडे केल्याचे स्पष्ट झाले. केबल चोरून नेण्याच्या उद्देशाने त्याने हा कट केला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून कटर जप्त करण्यात आले आहे. सपोनि गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.










