समन्वयातून मार्ग काढत शेतकऱ्यांना दिलासा; तालुका कृषी विभागाने दिले तत्काळ वितरणाचे आदेश
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या खतटंचाईच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तालुका कृषी अधिकारी आणि खत विक्रेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असून, शेतकऱ्यांसाठी युरियाचा साठा तातडीने खुला करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूव पारनेर येथे झालेल्या कांदा आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांनी खतांच्या तुटवड्याबाबत झावरे यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या होत्या. याची तातडीने दखल घेत त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून संवाद घडवून आणला. 1 जून रोजी पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुका कृषी अधिकारी घुले आणि तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांची संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीत खत विक्रेत्यांनीही आपल्या अडचणी मांडल्या. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच, नगर येथील मालधक्क्याचे काम सुरू असल्यामुळे खते कोपरगावमार्गे आणावी लागत असल्याने वाहतुकीचा अतिरिक्त खर्च विक्रेत्यांना सोसावा लागत आहे. याशिवाय, शासनाच्या नियमानुसार ‘बफर स्टॉक’ राखणे बंधनकारक असल्याने दुकानांमध्ये खत असूनही ते तत्काळ विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी आणि खत विक्रेते या दोन्ही घटकांच्या अडचणी समजून घेत सुजित पाटील झावरे यांनी समन्वयाची भूमिका मांडली. शेतकऱ्यांना वेळेत खते मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी विभागाने अधिक सक्रिय होऊन गैरसमज दूर करावेत आणि वितरण प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.बैठकीच्या अंती, सर्व स्तरांवर चर्चा करून उपलब्ध युरिया साठा त्वरित शेतकऱ्यांसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आले.










