पारनेर बार असोसिएशन आक्रमक| वकीलपत्र घेतल्याच्या रागातून भररस्त्यात शिवीगाळ
पारनेर | नगर सह्याद्री
न्यायालयात पक्षकाराचे वकिलपत्र घेतल्याच्या कारणावरून जवळे (ता. पारनेर) येथील एका निवृत्त पोलीस अधिकार्याने वकिलाला सार्वजनिक ठिकाणी गाठून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वकील संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
पारनेर बार असोसिएशनचे सदस्य अॅड. सोमनाथ गोपाळे यांनी एका प्रकरणाचे वकिलपत्र घेतले होते. याचा राग मनात धरून मुंबई पोलीस दलातील निवृत्त अधिकारी रामदास मारुती सालके (रा. जवळे) यांनी अॅड. गोपाळे यांना पारनेर न्यायालय परिसर आणि जवळे येथील कुकडी सहकारी पतसंस्थेच्या आवारात गाठले. यावेळी सालके यांनी भररस्त्यात वकिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावले.अॅड. गोपाळे यांनी तातडीने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे.
न्यायदानाच्या प्रक्रियेत वकिलपत्र घेणे हे वकिलाचे कर्तव्य आहे. मात्र, पक्षकाराचे वकिलपत्र घेतल्याच्या कारणावरून अॅड. सोमनाथ गोपाळे यांना धमकावणे हे निंदनीय असून, वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपी रामदास सालके याला तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा बार असोसिएशन तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अॅड. मंगेश औटी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
वकील संघटना आक्रमक: निषेध सभा आणि निवेदन
या घटनेचे पडसाद वकील वर्गात उमटले असून, पारनेर बार असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली होती. न्यायदानाची प्रक्रिया पार पाडणार्या वकिलांवर अशा प्रकारचे हल्ले किंवा धमया येणे, हे लोकशाहीसाठी घातक असून वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
पोलिसांचे आश्वासक पाऊल
पारनेर बार संघटनेचे अध्यक्ष अॅड. मंगेश औटी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक खेडकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी पारनेर तालुयातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.










