श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील पेढगाव येथे छत्रपती संभाजी महाराज पायी दिंडीचे मुस्लिम समाजाच्या वतीने उत्साहपूर्ण आणि श्रद्धाभावाने स्वागत करण्यात आले. दिंडी गावात दाखल होताच वारकऱ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. तसेच अल्पोपहार, चहा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून वारकऱ्यांची मनापासून सेवा करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शक्रुभाई शेख मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्वागत सोहळ्यात दिंडीतील वारकऱ्यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. वारकरी आणि ग्रामस्थांनी या आदरातिथ्याचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
या स्वागताचा सर्वात भावस्पश क्षण म्हणजे पेढगावातील अनेक मुस्लिम बांधवांनी हातात टाळ, खांद्यावर भगवे पताके घेऊन दिंडीच्या रिंगणात सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल… विठ्ठल… नामघोषात परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच इरफान पिरजादे, शक्रुभाई शेख, अन्सार शेख, इरफान काझी, पत्रकार शफीक हवालदार, जुबेर शेख, अमजद शेख, बशीर चौधरी, इब्राहिम शेख, मोईनुद्दीन शेख, ताहीर शेख यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.










