- जाहिरात -spot_img
breaking news

नाशिकमध्ये पावसाचा कहर; १० धरणांतून विसर्ग, २७ रस्ते बंद

नाशिक / नगर सह्याद्री –
सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली असून १० धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी, दारणासह अनेक नद्या, नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी आल्याने, दरड कोसळल्याने जिल्ह्यातील २७ रस्ते, पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सुरगाणा तालुक्यात भोरसाळ येथे नाल्यातील पुराच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू झाला. मालेगाव व इगतपुरी येथील सुमारे १०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ४२ घरांची पडझड झाली.

घाटमाथ्यावरील भागासह पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. पावसाने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पावसात सुरगाणा तालुक्यातील भोरमाळ येथे शेतातून घरी परतताना पुंडलिक चव्हाण (४२) यांचा नाल्यातील पुराच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर, कळवण, बागलाण व सुरगाणा भागात ४२ घरांची पडझड झाली. चार पशुधनाचे नुकसान झाले. इगतपुरी तालुक्यात घरात पाणी शिरल्याने १५ ग्रामस्थांना तर मालेगावला गिरणा नदी काठावरील ७० जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले.

पाणलोट क्षेत्रात पावसाने गंगापूर धरण तुडूंब भरले असून या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. नाशिक शहरातील गोदावरी पात्रातून १९,००० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक शहरासह निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेडा गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर शहरात एका घराचे पत्र्याचे छत उडून गेल्याने तीन जण जखमी झाले, त्यापैकी एक जण गंभीर जखमी असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर बस पात्रात अडकली
पुराचे पाणी पूल व रस्त्यावर आल्याने, दरड कोसळल्याने व माती खचल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २७ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात दरड कोसल्याने रस्त्यावर माती व भराव आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या मदतीने रस्ता पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले. त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील गणपती बारी येथे या हंगामातील दुसऱ्यांदा दरड कोसळल्याने तेथील वाहतूक दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेवरून वळविण्यात आली. महाराष्ट्र -गुजरात सीमेवर एक बस नदीपात्रात अडकली. सर्व प्रवाश्यांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन बलसाड (गुजराथ) प्रशासनाच्या संपर्कात आहे.

हे सुद्धा वाचा :  मोठी बातमी! 'साकळाई'ला मंत्रीमंडळाची मान्यता, विखेंच्या पाठपुराव्याला यश

धरणांतील विसर्गात वाढ
पावसाने जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली असून अनेक धरणे तुडूंब होण्याच्या मार्गावर असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गुरूवारी जिल्ह्यातील लहान-मोठ्या २६ धरणांमध्ये ४३ हजार ६८५ दशलक्ष घनफूट म्हणजे ६२ टक्के जलसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने गंगापूरच्या विसर्गात सायंकाळपर्यंत वाढ करावी लागली. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार गंगापूर धरणातून (१३९३२ क्युसेक), कडवा (१०९६५), भावली (३२४७), पालखेड (६६१०), पुणेगाव (८२०१), दारणा (१५४९८), गौतमी गोदावरी (३०००) आणि वालदेवी धरणातून (२१७५) क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल ५५ हजार ७७८ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. गिरणा खोरे धरण समुहातील चणकापूर (१८३९६) आणि हरणबारी (३६८९) क्सुसेक पाणी सोडण्यात आले. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ