सावेडीत जुन्या वादातून तरुणावर रॉडने हल्ला, पैसे हिसकावून जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील सावता खानावळीसमोरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोकरीवरून काढल्याचा राग मनात धरून ऋषिकेश रमेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोशन हरीराम तिडके हे सावेडी भागात जेवण करत असताना, आरोपी ऋषिकेश गायकवाड याने त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. चंदुकाका सराफ दुकानाच्या पाठीमागील निर्जन रस्त्याने एका ढाब्याजवळ नेऊन आरोपींनी त्यांना घेरले. तुला कंपनीने कामावरून का काढले? असा जाब विचारत आरोपींनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने रोशन यांच्या डोयावर, पायावर आणि पाठीवर गंभीर वार केले.केवळ मारहाण करूनच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी रोशन यांच्या खिशातील कंपनीचे ८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. जर पुन्हा या भागात दिसला किंवा पोलिसांत तक्रार केली, तर तुझा मुडदा पाडू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. जखमी रोशन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात खळबळ माजली असून, पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
डायल ११२ ला खोटी माहिती देणे भोवले
अहिल्यानगर : शासकीय यंत्रणेचा विनाकारण वापर करून पोलिसांची दिशाभूल करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कोठला परिसरात राहणार्या एका व्यक्तीने आपल्या वहिनीने मारहाण केल्याची खोटी माहिती मडायल ११२फ या मदत क्रमांकावर दिली. मात्र, तपासात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आल्याने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र तुकाराम घुंगासे हे रात्रीच्या वेळी मडायल ११२फ च्या कर्तव्यावर होते. यादरम्यान मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास आरोपी अमीर सलीम शेख (रा. कोठला, अहिल्यानगर) याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. आपल्या वहिनीने आपल्याला मारहाण केली असून तातडीने मदतीची गरज असल्याचे त्याने सांगितले. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी चौकशी केली असता, मारहाणीची कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने ही खोटी तक्रार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सरकारी कर्मचार्यांच्या कामात व्यत्यय आणून खोटी माहिती दिल्याप्रकरणी रवींद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून अमीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्याच्या पोलवरून देऊळगावमध्ये कुटुंबावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव सिद्धी येथे सीसीटीव्ही कॅमेर्याच्या पोलवरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडके, केबल आणि लोखंडी शस्त्रांनी मारहाण करण्यात आली असून, सोन्याचे दागिने आणि शेतीची अवजारे जबरदस्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी फिर्यादी प्रसाद बापूराव पडोळकर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपी रोमा पडोळकर, तुषार पडोळकर, सोन्याबापू पडोळकर, गणेश पडोळकर, दादा पडोळकर, रावसाहेब पडोळकर, अलका पडोळकर, सविता पडोळकर, पुष्पा पडोळकर, अर्चना पडोळकर, रोहिणी पडोळकर आणि भारत पडोळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरामागील सीसीटीव्ही पोल हलत असल्याचे समजताच ते पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी सर्व आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तिथे तोडफोड सुरू केली. आरोपींनी ट्रॅटरच्या सहाय्याने कल्टीव्हेटर आणि रोटाव्हेटर यांसारखी शेतीची अवजारे बळजबरीने नेली. यावेळी फिर्यादीच्या कुटुंबातील महिला सदस्य भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना अमानुष मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी बाथरूममध्ये लपले असता, आरोपींनी तिथेही जाऊन त्यांना लोखंडी शस्त्रांनी जखमी केले. घरातून सोन्याचे दागिनेही लांबवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.
कोतवाली हद्दीतून दुचाकी, मोबाईल लंपास
अहिल्यानगर: शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणाची दुचाकी आणि मोबाईल चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अथर्व विजय सपकाळ (वय २३, रा. भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अथर्व सपकाळ यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच.एफ. डिलस मोटारसायकल (क्रमांक एम.एच. १६ डी.ई. ६१५६) अकोळनेर रस्त्यावरील गुरुकुल शाळेच्या गेटसमोर उभी केली होती. ९ मे च्या रात्री ते १० मे च्या सकाळच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेतला. चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची ही दुचाकी आणि २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाईल असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी फिर्यादीने ११ मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
कौटुंबिक वादातून मायलेकावर हल्ला
अहिल्यानगर: जमिनीच्या किंवा जुन्या वादातून दोन गटात झालेल्या भांडणात मायलेकावर लोखंडी गजाने आणि लाकडी दांडयाने भीषण हल्ला केल्याची घटना धनगरवाडी येथे घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी महिलेचा हात मोडीत निघाला असून त्यांच्या मुलालाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धनगरवाडी परिसरात फिर्यादी त्यांच्या घरासमोर असताना आरोपी पाराजी गोदुराम नाचण आणि कविता पाराजी नाचण यांनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लोखंडी गज तसेच लाकडी दांडयाने फिर्यादींना लक्ष्य केले. या हल्ल्यात फिर्यादींचा डावा हात निकामी झाला असून आरोपींनी शिवीगाळ करत मतुम्हाला जिवंत सोडणार नाहीफ अशी जीवे मारण्याची धमकीही दिली. जखमींना उपचारासाठी तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. फौजदार शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.










