शिवस्मारकासाठी मतनोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर | नगर सह्याद्री
संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांची इच्छा आहे. याकरिता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. २०१८ मध्ये नगरपालिकेने याबाबत प्रथम प्रस्ताव केला. जे आता स्मारकाची मागणी करतात, ते त्यावेळी कुठेच नव्हते. या स्मारकासाठी शासनाकडे निधीची मागणी आहेच, अन्यथा शासनाच्या मदतीशिवाय लोकवर्गणी, नगरपालिका, आमदार निधी, जिल्हा विकास नियोजन या माध्यमातून संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जाहीर केले.
संगमनेर बसस्थानक येथे संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने कसे असावे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, याबाबत नागरिकांच्या मत नोंदणीचा शुभारंभ
करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, संदीप साळुंखे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, सौरभ कासार, भारत बोराडे, नितीन अभंग, सीमा खटाटे, दिलीपराव पुंड, अर्चना दिघे, शोभाताई पवार, प्राची काशीद, किशोर पवार, डॉ.अनुराधा सातपुते, वनिता गाडे, गजेंद्र अभंग, दिपाली पांचारीया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण, विजया गुंजाळ, अमर कतारी, सरोजना पगडाल, किशोर टोकसे, प्रियंका शहा, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, डॉ.दानिश खान, शिवजयंती उत्सव समितीचे सतीश आहेर, संजय क्षत्रीय यांच्यासह संगमनेरमधील विविध पक्षांचे व विविध सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाची अस्मिता आहे. त्यांचे भव्य स्मारक संगमनेरमध्ये पूर्ण करणार आहोत.
संगमनेर सेवा समितीला संगमनेरमधील नागरिकांनी भरभरून यश दिले. या सेवा समितीच्या सर्व नगरसेवकांनी पहिल्याच बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले,अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याचा ठराव पारित केला, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. महाराजांच्या स्मारकाबाबतही सर्व नागरिकांच्या मताचा आदर करून जनतेला जसे हवे आहे तसे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे आ. तांबे यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे म्हणाल्या की, संगमनेर हे शांत आणि सुसंस्कृत शहर आहे. येथे महाराजांचे भव्य स्मारक करण्यासाठी नागरिकांना हे स्मारक कसे हवे, याबाबत जाणून घेण्यात येणार आहे. याचबरोबर शहराच्या विकास कामांमध्ये नागरिकांचा सहभाग राहणार असल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी संगमनेर नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी,संगमनेर शहरातील विविध विभागाचे अधिकारी, आणि शहरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी ६११३ नागरिकांची मतनोंदणी
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकासमोर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, भव्य उभे महाराजांचे स्मारक आणि सिंहासनाधीश्वर महाराजांचे पूर्णाकृती स्मारक, असे तीन पर्याय देण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी आपले मत नोंदवा. ही नोंदणी तीन दिवस सुरू राहणार असून सर्वांनी आपले मत नोंदवावे. आपल्या सगळ्यांच्या मताचा आदर करून येत्या काळात भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले. पहिल्या दिवशी ६११३ नागरिकांनी मत नोंदणी केली आहे.










