होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक – दत्तात्रय कावरे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जुनी वसंत टॉकीज चौक परिसरात संगम तरुण मंडळाच्या वतीने यंदा इंदोरच्या धर्तीवर तब्बल पाच हजार एक गोवर्यांची आकर्षक होळी प्रज्वलित करण्यात आली. विशेष म्हणजे या होळीसाठी केवळ गोवर्यांचाच वापर करण्यात आला असून कोणत्याही लाकडाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने ही होळी उभारण्यात आली होती. आकर्षक सजावट आणि पारंपरिक रचनेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
होळी प्रज्वलनाचा कार्यक्रम मंत्रोच्चारांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात पार पडला. परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच बालगोपाळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून होळीचे दर्शन घेतले. संगम तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक दिवसांच्या परिश्रमातून ही भव्य होळी साकारली होती. मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक दत्तात्रय कावरे, मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश कावरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्तेयावेळी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शक नगरसेवक दत्तात्रय कावरे यांनी सांगितले की, होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रह्लादाच्या भक्तीमुळे होलिकेचा अंत झाला, यामागे सत्य आणि श्रद्धेचा संदेश आहे. होळी साजरी करण्यामागील उद्देश म्हणजे आपल्या मनातील मत्सर, द्वेष, अहंकार या नकारात्मक भावनांचा त्याग करून नव्या उत्साहाने आणि सकारात्मकतेने जीवनाची सुरुवात करणे. समाजात ऐक्य, बंधुभाव आणि सद्भावना वाढविण्यासाठी हा सण प्रेरणा देतो.
तसेच पुढे ते म्हणाले, पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करणे ही आजची गरज आहे. केवळ गोवर्यांचा वापर करून उभारलेली ही होळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आहे. सणांच्या माध्यमातून समाजात एकोपा वाढवणे, परंपरा जपणे आणि पुढील पिढीला संस्कार देणे हे आपले कर्तव्य आहे. संगम तरुण मंडळाने घेतलेली पुढाकार निश्चितच अनुकरणीय असून नागरिकांनीही अशा विधायक उपक्रमांना सहकार्य करावे.
कार्यक्रमाचे नियोजन संगम तरुण मंडळाच्या पदाधिकार्यांनी यशस्वीपणे पार पाडले. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.










