श्रीरामपूर, नगर, राहुरीत धाडसत्र/ पाकिस्तान गॅगस्टरशी संबंध, 10 ठिकाणी छापेमारी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पाकिस्तानातील कथित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाव्दारे संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (10 जुलै) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई केली. अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर आणि राहुरी येथे एकाचवेळी धाडसत्र राबवून एकूण 10 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही तरूणांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली असून त्यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अन्य डिजिटल उपकरणे तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने मराठवाडा भागातून 15 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील 10 जणांचा समावेश आहे. धाराशिव आणि जालना जिल्ह्यातून दोन आणि बीडमधील एकाचा समावेश आहे. एटीएसने शुक्रवारी राज्यभर विविध शहरांमध्ये एकाचवेळी विशेष तपास मोहीम राबविली. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरूणांशी संपर्क साधून त्यांना आपल्या ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानस्थित गुन्हेगारी नेटवर्कविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. अहिल्यानगर शहरातील दोन, राहुरी तालुक्यातील दोन आणि श्रीरामपूर शहरातील सहा अशा एकूण 10 ठिकाणी सकाळी साडेसहाच्या सुमारास एटीएसची विविध पथके पोहोचली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित तरूणांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या मोबाईल फोनमधील सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट, संपर्क, डिजिटल व्यवहार आणि अन्य ऑनलाइन हालचालींची तपासणी करण्यात आली. तसेच पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. तपास यंत्रणांकडून विशेषतः पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्याशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या डोगर गँगशी संबंधित सोशल मीडिया संपांचा मागोवा घेतला जात आहे.
अहिल्यानगर शहरात गांजा तस्करी उघड
60 हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील जुन्या महानगरपालिकेजवळ कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 60 हजार रुपये किमतीचा 3 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी अशोक दरंदले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसनगर येथील भगवानबाबा मंदिराजवळ राहणारा 24 वषय विशाल भिकाजी पारखे हा तरुण जुन्या महानगरपालिकेजवळ संशयास्पद रित्या फिरत होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये अंमली पदार्थ मिळून आला.
त्या गोणीत हिरवट रंगाचा, पाने व फुले असलेला आणि उग्र वास येणारा गांजा आढळून आला. गोणीसह त्याचे एकूण वजन 3 किलो 359 ग्रॅम आहे. हा मनोव्यापारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ विशाल पारखे याने कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. पोलिसांनी 60 हजार रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या कारवाईची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस करत आहेत.
केडगावमध्ये दोन टेम्पोच्या बॅटऱ्या चोरीला
अहिल्यानगर: शहरातील केडगाव परिसरातील भूषण नगर येथील राणी लक्ष्मीबाई चौकात एक चोरीची घटना समोर आली आहे. घरासमोर पार्क केलेल्या दोन वेगवेगळ्या टेम्पोच्या महागड्या बॅटऱ्या अज्ञात चोराने चोरून नेल्या आहेत.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण नगर येथे राहणारे यश प्रभाकर भांबरकर (वय 26 वर्षे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. यश भांबरकर यांनी त्यांचे टेम्पो नेहमीप्रमाणे घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केले होते. 7 जुलैच्या दुपारपासून ते 10 जुलैच्या सकाळच्या दरम्यान अज्ञात चोराने या संधीचा फायदा घेतला. चोराने अशोक लेलंड दोस्त टेम्पो आणि आयशर टेम्पो या दोन्ही गाड्यांच्या बॅटऱ्या अत्यंत चाणाक्षपणे काढून घेतल्या. यामध्ये सुमारे 14 हजार रुपये किमतीच्या दोन्ही बॅटऱ्या चोरीला गेल्याचे समोर आले आहे. गाड्या चालू न झाल्यामुळे यश भांबरकर यांनी तपासणी केली असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी संतोष बनकर करत आहेत.
उसने पैसे मागितल्याने तरुणाला मारहाण
अहिल्यानगर : उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल सुरेश घाटेशाही (वय 28, रा. गवळी वाडा, भिंगार) असे मारहाण झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्फराज उर्फ अंडा बाबा शेख (रा. आलमगीर, भिंगार) या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अमोल घाटेशाही यांनी आरोपी सर्फराज याला काही पैसे उसने दिले होते. 6 जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमोल हे स्टेट बँक चौकात आले असता, त्यांनी आरोपीकडे आपल्या हक्काच्या पैशांची मागणी केली. याचाच राग आल्याने आरोपी सर्फराज याने अमोल यांना रस्त्यात गाठून मारहाण केली.










