जन्म दाखल्यासाठी घेतली लाच | मुख्याधिकारी अजय साळवे यांची कारवाई
जामखेड | नगर सह्याद्री
जन्म दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी जामखेड नगरपरिषदेतील लिपिक अभिजित जालीम भैसडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1999 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांनी केलेल्या कारवाईत प्रथमदर्शनी दोष सिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7, 7(अ), 11 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेल्या अभिजित भैसडे यांनी जन्म दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या कारवाईत संबंधित प्रकार उघडकीस आला.
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आदेशात नमूद केले आहे की, संबंधित कर्मचाऱ्याचे वर्तन अत्यंत गंभीर, अशोभनीय व महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांचे उल्लंघन करणारे असून प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे नियम 4(1) अन्वये त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात अभिजित भैसडे यांचे मुख्यालय जामखेड नगरपरिषद राहणार असून मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, इतर कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.










