मुंबई / नगर सह्याद्री-
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका वादग्रस्त घटनेबद्दल पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केले आहे. त्या वेळी सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये रवीना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आणि एका महिलेला धडक दिल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणामुळे अभिनेत्रीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता एका मुलाखतीत रवीना टंडनने या संपूर्ण प्रकरणामागे खंडणी वसूल करण्याचा कट रचला गेला होता, असा गंभीर आरोप केला आहे.

ती म्हणाली की, “देवाची कृपा म्हणून आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज होते. त्यामुळे लगेच सत्य बाहेर आले. सोशल मीडियाचे फायदे जितके आहेत, तितकेच त्याचे तोटेही आहेत.” रवीनावर त्या वेळी एका महिलेसोबत मारहाण केल्याचा आरोप झाला होता. संबंधित महिलेनं दावा केला होता की, अभिनेत्रीच्या गाडीने तिच्या आईला धडक दिली. मात्र रवीना म्हणाली की, प्रत्यक्षात असा कोणताही अपघात झाला नव्हता. उलट तिच्या ड्रायव्हरला मुद्दाम लक्ष्य केले जात होते. या घटनेची आठवण सांगताना रवीना म्हणाली की, “त्या दिवशी जवळपास ३० लोक आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. जमावाने माझ्या ड्रायव्हरला घेरले आणि त्याला मारहाण सुरू केली. माझी मुलं घरात होती आणि माझे पती अनिल थडानी ऑफिसमध्ये होते. अशा वेळी मी शांत बसले असते का? मला माझ्या कुटुंबाचे रक्षण करायचे होते. रवीना पुढे म्हणाली की, काही महिला मुद्दाम तिच्या ड्रायव्हरवर खोटे आरोप करत होत्या. “मी त्या परिसरातील लोकांना ओळखते. मला वाटलं, जर माझ्या ड्रायव्हरकडून काही चूक झाली असेल तर मी जाऊन माफी मागावी. पण मी बाहेर पडताच सगळे जण माझीच वाट पाहत असल्यासारखे वागत होते,” असे तिने सांगितले.

अभिनेत्रीच्या मते, तिच्या ड्रायव्हरने फक्त मोबाईलचा कॅमेरा खाली केला होता. त्यानंतर एका महिलेने त्याच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. “मला वाटलं, निष्पाप ड्रायव्हर अडचणीत येईल. म्हणून मी स्वतः बाहेर जाऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला,” असे रवीना म्हणाली. रवीनाने दावा केला की, पोलिसांनीही तिला सांगितले होते की हा सगळा प्रकार पैशांसाठी रचलेला कट होता. लोक मुद्दाम तिची वाट पाहत होते, जेणेकरून तिला घाबरवून मोठी रक्कम उकळता येईल. दरम्यान, रवीना टंडन लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अरशद वारसी, परेश रावल, लारा दत्ता, दिशा पाटनी आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.










