45 वारकरी होणार सहभागी
लोणी | नगर सह्याद्री
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सहकार पंढरी लोणी बुद्रूक येथून ‘प्रवरा रिअल एक्सरसाईज ग्रुप’च्या वतीने येत्या 10 ते 12 जुलै या कालावधीत ‘लोणी ते पंढरपूर’ सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तीमय वातावरणात निघणारी ही सायकल दिंडी पंढरपूर येथील ऐतिहासिक आणि मानाच्या सायकल रिंगणातही विशेष सहभाग नोंदवणार असल्याची महिती दिंडीचे संचालक भाऊसाहेब विखे व उदय पोकळे यांनी दिली.
‘प्रवरा रिअल एक्सरसाईज ग्रुप’च्या वतीने काढण्यात येणाऱ्या या सायकल वारीचे यंदाचे हे सलग दुसरे वर्ष आहे. ‘प्रदूषणमुक्त पर्यावरण’ आणि ‘धावपळीच्या युगात निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवा’ हा सामाजिक संदेश घेऊन हे सायकल वारकरी पंढरीच्या दिशेने पेडल मारणार आहेत. सायकल दिंडीमध्ये एकूण 45 सायकल वारकरी विठूनामाच्या जयघोषात सहभागी होणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण सायकलपटूंचा समावेश आहे. वारी दरम्यान सर्वांसाठी एकसमान पोशाख आणि सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.या सायकल वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून दिंडीसोबत एक बॅकअप वाहन देखील असणार आहे. यामध्ये प्रथमोपचार किट, आणि आवश्यक औषधे तसेच लांबच्या प्रवासात सायकल खराब झाल्यास ती जागेवरच दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक साहित्य असणार आहे.
10 जुलै रोजी पहाटे 5 वाजता लोणी बु्द्रूक गावचे ग्रामदैवत श्री.म्हासोबा महाराजांना अभिषेक आणि आरती करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. पहिल्या दिवशी एकूण 137 किलोमीटरचे अंतर पार करून ही दिंडी मुक्ताई मंगल कार्यालय, माहिजळगाव येथे रात्रीच्या भोजनासाठी व मुक्कामासाठी विसावेल. दुसऱ्या दिवशी दि. 11 जुलै रोजी शनिवारी सकाळी माहिजळगाव येथून विठ्ठलाच्या जयघोषात दिंडी पंढरपूरकडे रवाना होईल. दुपारी 4 वाजता या सायकल दिंडीचे पंढरपूरच्या पवित्र भूमीत आगमन होणार आहे. दि.12 जुलै रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध व भव्य सायकल रिंगणात हे 45 वारकरी सहभागी होणार आहेत.










