एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंथेहाथ पकडले, राहुरी नगरपालिकेत कारवाई
राहुरी | नगर सह्याद्री
शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेतून तीस हजार रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात १ हजार रुपयाची लाच स्वीकारण्याची घटना राहुरी नगरपालिकेत घडली. याप्रकरणी राहुरी नगरपरिषदेतील कंत्राटी सहायक प्रकल्प अधिकारी लाच घेताना पकडला. त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी नगरपालिकेत कंत्राटी स्वरुपात महिला व बालविकास विभागात सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून बाबासाहेब किशोर राऊत (रा.बुरुडगाव रोड, ता.जि. अहिन्यानगर ) हे काम पाहत आहे. तक्रारदाराला शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेतून ३० हजार रुपयांची मदत पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी सहायक प्रकल्प अधिकारी बाबासाहेब राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राहुरी तहसील कार्यालयात ओळख असल्याचे सांगितले.
त्याबदल्यात एक हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली असता २० मार्च रोजी दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान राहुरी नगरपालिकेत सापळा लावण्यात आला. तक्रारदराकडून एक हजार रुपये घेताना सहायक प्रकल्प अधिकारी बाबासाहेब राऊत यांना रंगेहाथ पकडले. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली पो.कॉ.गजानन गायकवाड, वैभव सुपेकर, सचिन सुद्रिक यांच्या पथकाने केली.










