- जाहिरात -spot_img
breaking news

बनावट सह्यांच्या आधारे ८८ लाखांची फसवणूक; आक्षेपार्ह पोस्ट आता ग्रुप ऍडमिनला भोवणार, जुन्या वादातून राडा…

अहिल्यानगरमध्ये तीन भागीदारांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे एका व्यक्तिची तब्बल ८८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​रमेश हौशिनाथ पोखरकर (वय ५०, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोखरकर यांची आरोपी अतुल अरुण नलावडे याच्याशी व्यावसायिक ओळख झाली होती. आरोपींनी फिर्यादी यांच्या नकळत त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ‘युनायटेड एंटरप्रायजेस’ नावाची एक खोटी भागीदारी संस्था अहिल्यानगर येथे स्थापन केली. या संस्थेमध्ये पोखरकर यांना २५ टक्के भागीदारी असल्याचे कागदपत्रांवर दाखवले गेले.

​या बनावट पत्राच्या आधारे आरोपी विकास दशरथ पानसंबळ, अतुल नलावडे आणि धीरज बालाजी तनपुरे यांनी बँकेत चालू खाते उघडले. त्यानंतर फिर्यादींची कोणतीीही संमती न घेता, आरोपींनी त्यांच्या नावे व्यावसायिक वाहनासाठी बँकेकडून ८८ लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर पोखरकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण आणि पोलीस अंमलदार लोणारे करत आहेत. या घटनेमुळे व्यवसाय क्षेत्रात आणि अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; अहिल्यानगरमधील तरुणाविरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा
​अहिल्यानगर : सोशल मीडिया आणि फोनवरून ओळख वाढवून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत मानसिक छळ व फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगर येथील सारसनगर भागातील रहिवासी आयुष दीपक मेहर या तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील रहिवासी असलेल्या एका पीडित तरुणीला मार्च २०२४ मध्ये एका अज्ञात नंबरवरून फोन आला होता. फोन करणाऱ्या आयुष मेहर याने आयटी कंपनीच्या प्रोजेक्टच्या बहाण्याने तरुणीशी ओळख वाढवली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यादरम्यान संशयित आरोपीने तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन दिले. या विश्वासाचा फायदा घेत त्याने व्हिडिओ कॉलवर अश्लील संभाषण करणे आणि पीडितेकडे नग्न फोटोंची मागणी करत मानसिक दबाव टाकण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा :  गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर; घेतला हा निर्णय

​पीडित तरुणीने फोटो देण्यास नकार दिला असता, आरोपीने तिच्याशी वाद घालून संपर्क तोडला. दरम्यान, आरोपीचा शोध घेत तरुणी अहिल्यानगर येथे आली. तेथे तिला समजले की आरोपीचा २४ जून २०२६ रोजी लोणावळा येथे विवाह ठरला आहे. आरोपीच्या कुटुंबीयांनीही तरुणीला अपमानास्पद वागणूक दिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण तेलंगणा येथील सुभेदारी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

मोहरम उत्सव: सोशल मीडिया ग्रुप अॅडमिनवर पोलिसांची करडी नजर; आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार कडक कारवाई
​अहिल्यानगर: शहरात १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत मोहरम उत्सव साजरा केला जाणार आहे. या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सण शांततेत पार पडावा, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी एक महत्त्वाचा इशारा देणारी नोटीस जारी केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे.

​उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये, म्हणून पोलिसांनी ग्रुप प्रमुखांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सोशल मीडियावर दोन गटांत किंवा समाजात तेढ निर्माण होईल, असा कोणताही वादग्रस्त मजकूर, संदेश अथवा छायाचित्रे व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर प्रसारित करू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, समाजात भीती किंवा गैरसमज पसरवणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

​आपल्या ग्रुपवर येणाऱ्या प्रत्येक संदेशाची पडताळणी करण्याची मुख्य जबाबदारी ही ग्रुप अॅडमिनची असेल. जर कोणी नियमांचे उल्लंघन करून आक्षेपार्ह मजकूर पसरवला, तर त्याला सर्वस्वी ग्रुप अॅडमिन जबाबदार धरले जाईल. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला आहे. पोलिसांनी नागरिकांना सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा :  हिंदू विरोधातील जिहाद्यांचे षडयंत्र वेळीच ओळखा; भविष्यात जिहाद्यांपासून हिंदूंना मोठा धोका, आ.संग्राम जगताप काय म्हणाले पहा

जुन्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; लोखंडी रॉडने हल्ला करत बापासह मुलीला बेदम मारहाण
​अहिल्यानगर : तालुक्यातील कापूरवाडी येथे जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादात आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एका व्यक्तीला आणि त्यांच्या मुलीला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​कापूरवाडी येथील रहिवासी नंदराम सुदाम भिंगारदिवे (वय ४८) हे १५ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभे होते. यावेळी गावातीलच आरोपी सुरेश आंबादास भिंगारदिवे, योगेश उर्फ बबलू सुरेश भिंगारदिवे, शुभम सुरेश भिंगारदिवे आणि इतर तीन महिला आरोपींनी पूर्ववैमनस्यातून नंदराम यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

​हा वाद इतका वाढला की, सर्व आरोपींनी संगनमत करून नंदराम यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी त्यांची मुलगी मध्ये पडली असता, आरोपींनी तिलाही बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी दोघांनाही अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

​या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नंदराम भिंगारदिवे यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सहाय्यक निरीक्षक धोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पठारे आणि मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कौटुंबिक वादातून वयोवृद्ध दांपत्याला लाकडी दांडक्याने मारहाण; अहिल्यानगर येथील घटना
​अहिल्यानगर: केडगाव परिसरातील मोतीबाग कॉलनी येथे कौटुंबिक वादातून एका वयोवृद्ध दांपत्याला लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  हॉस्पिटलला पार्किंग सुविधा नसल्याने शिवसेना आक्रमक; काय दिला इशारा पहा...

​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय माधवराव वाईकर (वय ६५, रा. केडगाव) हे त्यांच्या घरात कुटुंबासह बसलेले होते. यावेळी आरोपी ज्ञानेश्वर प्रभाकर शिंदे, त्याचा चुलत भाऊ, लक्ष्मीकांत दत्तात्रय वाईकर आणि सपना लक्ष्मीकांत वाईकर यांनी संगनमत करून घरात प्रवेश केला. “तुम्ही माझ्या बहिणीला त्रास का देता?” असे म्हणत ज्ञानेश्वर शिंदे याने फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादींच्या पत्नीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच दुसऱ्या आरोपीने फिर्यादी दत्तात्रय वाईकर यांच्या हातावर लाकडी दांडक्याने वार करून त्यांना दुखापत केली.

​हल्ल्यादरम्यान आरोपींनी घराच्या खिडक्यांच्या काचा आणि दारात उभी असलेली स्वीफ्ट गाडी फोडून मोठे नुकसान केले. ‘जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, तर उद्यापासून तुम्हा दोघांना एकेकाला पाहून घेऊ’ अशी जीवे मारण्याची धमकीही यावेळी लक्ष्मीकांत आणि सपना वाईकर यांनी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या वाईकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ