मनपात बजेटवर चर्चा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नालेगाव, केडगाव प्रमाणे सावेडीगावचा सिटी सर्व्हे करण्यात यावा या मागणीसाठी सावेडीतील नगरसेवकांनी नगररचनाकार यांना धारेवर धरले. सभा सुरु होताच सावेडीतील नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने तासभर याच मुद्द्यावर चर्चा सुरु होती.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या वतीने महासभेत महापौर ज्योतीताई गाडे यांच्याकडे १७३८ कोटींचे अंदाजपत्रक स्थायीचे सभापती सुभाष लोंढे यांनी सादर केले आहे. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली होती. महासभेला सादर झालेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महापौर ज्योतीताई गाडे यांच्या अध्यक्षतेखाली
दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर अॅड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डागे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे, रविंद्र बारस्कर, करण कराळे यांनी सावेडीगावचा सिटी सर्व्हे करण्याबातचा मुद्दा उपस्थित झाला. नगरसेवकांनी नगररचनाकार यांना चांगलेच धारेवर धरले. नालेगाव, केडगावचा सिटी सर्व्हे झाल्यामुळे तेथील नागरिकांना अडचणी येत नाहीत. परंतु सावेडीगावचा सिटी सर्व्हेच झाला नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा पाढाच नगरसेवकांनी वाचला. या प्रश्नावर सावेडीतील सर्वच नगरसेवकांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले.
पिंपळगाव माळवीतील मनपाच्या जागेवर अतिक्रमण
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे महापालिकेची ७०० एकर जागा आहे. या जागेसंदर्भात नगरसेवक निखील वारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात उत्तर देतांना महापालिकेचे अधिकारी चांगलेच हतबल झाल्याचे पहावयास मिळाले. पिंपळगावमध्ये ७०० एकर जागा आहे. परंतु, यातील जागेवर शेती केली जात असून अतिक्रमण असल्याचे अधिकार्यांनी यावेळी सांगितले.










