पाथर्डी / नगर सह्याद्री –
राज्यातील भटया-विमुक्तांचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. परंपरेप्रमाणे कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या सुमारे २०० फूट उंच असलेल्या मुख्य कळसाला मानकरी अशोक जाधव व त्यांच्या सहकार्यांनी टेकविली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी ‘अलख निरंजन’चा जयघोष केला, तर डफांच्या कडकडाटाने संपूर्ण मढी नगरी दुमदुमून गेली.
या मानाच्या काठीने अधिकृत यात्रा सुरू झाल्याचा संकेत मानला जात असून, आगामी १५ दिवस हा भक्तीचा सोहळा चालणार आहे.मढी यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून, अठरापगड जातींच्या सामाजिक प्रतिनिधित्वाचे दर्शन येथे घडते. यामध्ये कैकाडी समाजाचा मान अनन्यसाधारण आहे. या समाजाने नाथांची सेवा करत समाधी मंदिर बांधकामासाठी मोठे योगदान दिले असल्याने, स्वतः चैतन्य कानिफनाथांनी या समाजाला काठीचा मान दिला आहे. सुमारे दोन महिन्यांपासून २५ सेवकांचा डफ वाजवण्याचा सराव सुरू असतो, ज्याच्या तालावर भाविकांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो.
पाथर्डी येथील नाथसेवक दिवंगत नारायण बाबा जाधव यांनी अनेक वर्षे या परंपरेचे नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनानंतर यंदा अशोक जाधव यांनी ही जबाबदारी पार पाडली. यावेळी अंबादास जाधव, राजेंद्र जाधव, जालिंदर जाधव, बन्सी जाधव, राम जाधव, हिरामण जाधव, संजू गायकवाड, आप्पा गायकवाड, संजू जाधव, अंबादास जाधव, राम गायकवाड, बालाजी गायकवाड, बंडू गायकवाड, पांडू जाधव, बाळू जाधव यांच्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैकाडी समाजाची काठी कळसाला लागल्यानंतरच यात्रेचे पुढील मानपान सुरू होतात. याच दिवशी सायंकाळी गोपाळ समाजाला गावाची सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान देण्यात येतो. मढी हे राज्यातील असे एकमेव गाव आहे, जिथे गावचा मूळ सन्मान इतर समाजांना देऊन ग्रामस्थ स्वतः ‘नाथ सेवक’ म्हणून राबत असतात.
देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सरचिटणीस माधुरी मरकड, चिटणीस अनिल साठे, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, विश्वस्त उत्तम मरकड, मदन मरकड, उषा मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार व व्यवस्थापक संजय मरकड यांनी मानकरी व भाविकांचे स्वागत केले. नाथांच्या आशीर्वादाने आम्हाला संकटांशी लढण्याचे बळ मिळते, अशी भावना मानकरी अशोक जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.










