सांगली / नगर सह्याद्री –
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावाजवळ घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरण उघडकीस आले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात तपासादरम्यान विम्याचे तब्बल ३० लाख रुपये मिळविण्यासाठी ३ लाख रुपयांची सुपारी देऊन खून झाल्याचे निष्पन्न झाले असून रामचंद्र धनप्पा खिलारे (रा. सांगली) तुकाराम मारुती सांगोलकर (रा.जत) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मेहुण्याने स्वतःच्या भावोजीचा पैशासाठी खून केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
दिनांक १९ मे रोजी विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची गावाजवळील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे हे मयत अवस्थेत आढळून आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा आणि वैद्यकीय निष्कर्षातून मृत्यू अपघातामुळे नसून डोक्यात गंभीर मारहाण झाल्यामुळे झाल्याचा संशय बळावला. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासा दरम्यान मेहुणा दत्तात्रय खिलारे याने आपले भावोजी दत्तात्रय चाबरे याचा 30 लाखाचा अपघाती विमा काढला होता. त्याचे हप्ते पण तोच भरत होता. ती अपघात मृत्यूच्या विम्याची रक्कम आपल्या बहिणीला मिळावी यासाठी मेहुणा रामचंद्र खिलारे याने स्वतःताचे भावोजी दत्तात्रय चाबरे यांचा खून करण्यासाठी तुकाराम सांगोलकर यास 3 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे धक्कादायक पुरावे पोलिसांच्या हाती लागले. या दोघांनी संगनमत करून कट रचत दत्तात्रय चाबरे यांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले. सुरुवातीला अकस्मात मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणामागे सुपारी देऊन केलेल्या खुनाचा कट उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.










