आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कुकडी प्रकल्पाच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः येडगाव धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांहून अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विसापूर कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठीही मोठा दिलासा मिळणार आहे.
धरणांमध्ये वाढलेल्या पाणीसाठ्याची माहिती मिळताच आमदार पाचपुते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी तातडीने संपर्क साधून विसापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा, लाभक्षेत्रातील शेतीची गरज आणि शेतकऱ्यांची परिस्थिती याकडे लक्ष वेधले. कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीची दखल घेत प्रशासनाने पाणी सोडण्यास मंजुरी दिली.
या निर्णयामुळे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप पिकांना तसेच पुढील रब्बी हंगामाच्या नियोजनालाही या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.










