विविध संघटना झाल्या आक्रमक
निघोज | नगर सह्याद्री
निघोज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मळगंगा माध्यमिक विद्यालय , मोरेश्वर मंदिर, दर्गा परिसरात राजरोसपणे दारुअड्डा सुरु असून याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी सक्षमपणे कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवबा संघटना, धर्मवीर प्रतिष्ठान, पत्रकार संघ, व्यापारी असोसिएशन, आजी-माजी सैनिक संघटना, शिवबा दुर्गसंवर्धन समिती, स्कूल कमिटी पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती, निघोज ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निघोज पोलीस बीट विभागाचे उपनिरीक्षक कोळपे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सुभाष वराळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बबनराव तनपुरे, हिंदवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव वराळ, मुलिका देवी स्कूल कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, सैनिक संघटनेचे पदाधिकारी मेजर विकास वराळ, मेजर सत्यवान लंके, दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष राजूभाऊ लाळगे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. बाळासाहेब लामखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, आपला गणपती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविशेठ रणसिंग, संतोष देशमुख, रामा ढवण, महादू लामखडे, दत्ता चौधरी, स्वप्नील जाधव आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली अनेक वर्षांपासून मळगंगा विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोज मोरेश्वर मंदिर, दर्गा परिसरात दारुचा अड्डा सुरू आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करुनही पोलीस कोनत्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत. याचा अर्थ दारु अड्डा मालक व पोलिस यांची मिलीभगत आहे. या दारुअड्डा परिसरात शाळा आहेत. मोरेश्वर मंदिर आहे. तसेच मुस्लिम समाजाचा दर्गा आहे. तसेच परिसरातील लोकवस्ती मोठ्या संख्येने आहे. पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत हा दारु अड्डा सुरू असल्याने सातत्याने तळीराम झिंगलेल्या अवस्थेत असतात. शिव्याने व सातत्याने ओरडण्याने परिसरातील शाळांचे विद्याथ, महिला, शिक्षक, ग्रामस्थ यांना मनस्ताप होत असतो.
ज्या पोलिसांकडे तक्रारी केल्या, त्यांनीच दारु अड्डा मालकाला पाठबळ दिल्याने सर्वांचाच नाईलाज झाला म्हणून परिसरातील सर्व सामाजिक संघटनांनी ‘दारु अड्डा हटाव, ग्रामस्थ बचाव’ ही मोहीम हाती घेतली असून उपनिरीक्षक कोळपे यांना निवेदन दिले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक खेडेकर तसेच उपनिरीक्षक खंडागळे यांनाही निवेदन देऊन समक्ष भेटूल काही ज्येष्ठ नागरिकांनी या दारुअड्याची सविस्तर माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या आठ दिवसांत पोलिसांनी या दारू अड्ड्यावर कायमस्वरूपी कारवाई न केल्यास निघोज पोलीस स्टेशनपुढे ग्रामस्थ बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
बोबडेंची वळाली बोबडी
निघोज पोलीस स्टेशनमध्ये बोबडे आडनावाचा पोलीस कार्यरत आहे. निवेदन देतेवेळी दारू अड्ड्यावर कारवाई करणे हे आमचे काम नाही, त्यासाठी दारुबंदी विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असल्याचे बोबडे यांनी सांगितले. उपस्थित ग्रामस्थांनी हप्ते कोण, कुठून कशाप्रकारे घेतो याची आम्हाला सविस्तर माहिती आहे. जास्त खोलात गेल्यास तुम्ही बदल्या करून घ्याल, जरा शिस्तीत काम करा. पोलिसांचा कोणता विभाग काय काम करतो, याची अक्कल आम्हाला शिकवू नका, अशा शब्दांत ग्रामस्थांनी प्रश्नाचा भडीमार केल्याने बोबडे यांची बोबडीच वळाली.










