- जाहिरात -spot_img
breaking news

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लुटले; अपहार केलेला ७८ लाखांचा कापड माल जप्त…,कोंबड्यांच्या झुंजीवर छापा

अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल ७८ लाख ८२ हजार रुपयांचा कापड माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई थेट राजस्थान राज्यात जाऊन करण्यात आली, ज्यामुळे पोलिसांच्या तपासाची कार्यक्षमता पुन्हा एकदा समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील व्यापारी अमरिशकुमार गुप्ता यांच्या कंपनीचा ५५५ कापड रोलचा माल बेंगलोरला पाठवण्यात आला होता. मात्र, चालक संजय लिलाधर कुमार आणि लीनर लिलू मिना (नंदलाल मिना) यांनी संगनमत करून त्यातील ४७० रोलचा अपहार केला. या मालाची किंमत तब्बल ७८ लाख ८२ हजार १८४ इतकी आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला.पोलिस पथकाने नवापुर (जि. नंदुरबार) येथे तपास करत सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर सलग चार दिवस तपास करत पथक राजस्थानपर्यंत पोहोचले.राजस्थानातील चुरु जिल्ह्यातून मोहम्मद युनुस सलाउद्दीन, बाबुलाल जीवनलाल जाट आणि मोहम्मद अमिर सज्जाद यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून अपहार केलेला माल झालावाड जिल्ह्यातील मनोहरठाणा येथे लपवून ठेवलेला असल्याचे उघड झाले.पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ४७० कापड रोल जप्त केले, ज्याची किंमत ७८.८२ लाख आहे. संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी व जप्त माल पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले
अहिल्यानगरमधील केडगाव येथील घटना
अहिल्यानगर – केडगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला भविष्य सांगण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  ड्रग्स माफियांविरोधात आमदार दाते आक्रमक; एमडी तस्करी प्रकरणावर लक्षवेधी, मुख्यमंत्री म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चंद्रसेन गायकवाड (वय ६८, रा. समतानगर, केडगाव) हे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास केडगाव वेस परिसरात बसले होते. यावेळी दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने ’मी खूप मोठा ज्योतिषी आहे, तुमचे भविष्य पाहतो’ असे सांगून गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. एका दगडाचा रुद्राक्ष करून दाखवत भामट्यांनी त्यांना भुरळ घातली. त्यानंतर ’भविष्य पाहण्यासाठी बोटातील अंगठी २० रुपयांच्या नोटेत गुंडाळून ठेवा’ असे त्यांना सांगण्यात आले.

गायकवाड यांनी विश्वासाने ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून दिली. आरोपीने सदर अंगठी नोटेत गुंडाळून त्यांच्या शर्टाच्या खिशात टाकल्याचा बनाव केला. काही वेळाने दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. संशय आल्याने गायकवाड यांनी खिशाची तपासणी केली असता, त्यात अंगठी आणि २० रुपयांची नोट मिळून आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. फिर्यादीनुसार, एक आरोपी ३५ वर्षांचा असून त्याने पांढरा शर्ट घातला होता, तर दुसरा २५ ते ३० वयोगटातील आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोंबड्यांच्या झुंजीवर एलसीबीचा छापा २१ जुगारी जेरबंद
अहिल्यानगर -पोखर्डी गावाच्या शिवारातील पिंपळगाव उजनी रोडवर सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणार्‍या २१ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णू भागवत यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोखर्डी शिवारातील एका मोकळ्या जागेत कापडी मंडप टाकून कोंबड्यांची झुंज लावली जात होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांची हारजित सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी शुभम बौद्ध, आशरफ खान, मोहम्मद अली शेख, अमजद मगदूम, सय्यद अझर अक्तर, रोहित गोहिर, संदीप कुडीया, राम क्षत्रिय, तौफिक शेख, अझहर शेख, योगेश छजलानी, संतोष गोयल, विकी सुजगोहर, जितेंद्र म्हात्रे, अमीन शेख, तुषार मुलतानी, समीर शेख, वसीम शेख, गोविंद राजुडीया, सोहेल सय्यद आणि उत्तम साळवे हे कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले.

हे सुद्धा वाचा :  शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर, कोणती कामे होणार पहा

पोलिसांनी या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यासह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार दिवटे करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ