महिला संघटनांच्या शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन;
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवस उलटून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने शहरातील महिला वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध महिला संघटनांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 16 मार्च) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन आरोपी कळमकर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच आरोपीला त्वरित अटक न झाल्यास शहरातील महिला संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला.
महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महिलांवर अत्याचार करून आरोपी फरार राहत असल्याने समाजात कायद्याचा धाक उरलेला नाही. या प्रकरणात तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली तर समाजातील विकृत प्रवृत्तीवर वचक बसेल. अन्यथा अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणात 21 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अत्यंत संतापजनक व लज्जास्पद असून संपूर्ण समाजाची मान खाली घालणारी असल्याचे महिलांनी म्हटले आहे. इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवूनही संबंधित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी धक्कादायक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
महिलांच्या म्हणण्यानुसार आरोपी अभिषेक कळमकर हा पोलीस प्रशासनाला वारंवार चकवा देत असून फरार राहण्याचा प्रयत्न करीत आहे. कायद्यापासून पळ काढणाऱ्या अशा व्यक्तीला तात्काळ बेड्या ठोकणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित विकृत स्वरूपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला वर्गामध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण तयार झाले असून समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात आहे.
एखाद्या सामान्य नागरिकावर असा गंभीर गुन्हा दाखल झाला असता तर त्याला तात्काळ अटक झाली असती. मात्र आरोपी हा माजी महापौर असल्यामुळे त्याला राजकीय संरक्षण दिले जात आहे का? असा सवाल महिला वर्गाने उपस्थित केला आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे हे दाखवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने माजी महापौर अभिषेक कळमकर यांना तात्काळ अटक करावी, या प्रकरणाचा जलदगतीने व निष्पक्ष तपास करावा तसेच पीडित महिलेला संपूर्ण कायदेशीर संरक्षण व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महिलांनी केली.
यावेळी शितल भंडारे, लता वैरागर, सारिका साळवे, पायल भाकरे, ललिता ठोफ्लबे, जया रोकडे, मनिषा साळवे, नंदा पवार, वर्षा जगताप, छाया जाधव, सुमन साळवे, पुनम वाकोडे, सरोजनी इंगळे, गौरी कासार, राणूबाई भंडारी, रुपाली प्रबळकर, अंजना भंडारी, शारदा साळी आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
अन्यथा महिलांना रस्त्यावर उतरावे लागेल
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे अशा प्रवृत्ती वाढत आहेत. माजी महापौर अभिषेक कळमकर यांना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे त्यांना अटक होत नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी आरोपीला तात्काळ अटक करून शहरातून त्याची धिंड काढावी, ज्यामुळे महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांच्या मनात धाक निर्माण होईल. पोलीस प्रशासनाने याबाबत खंबीर भूमिका घ्यावी, अन्यथा महिलांना रस्त्यावर उतरावे लागेल. -शितल नाटीकर (महिला सामाजिक कार्यकर्त्या)










