- जाहिरात -spot_img
breaking news

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने अभियंत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; जमिनीच्या वादातून राडा, दारूची नशा पडली महागात…

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
लेबर वॉचमनचा पगार देण्यासाठी गेलेल्या एका अभियंत्याला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कुऱ्हाडीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बोल्हेगाव रस्ता परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. या हल्ल्यात सुबोध संजय फुंदे (वय ३२, रा. सूर्यनगर, शनि पॅलेस हॉटेलजवळ, अहिल्यानगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदवला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​सुबोध फुंदे हे व्यवसायाने अभियंता (इंजिनिअर) असून नगर शहर आणि सावेडी परिसरात त्यांच्या बांधकामाच्या साईट्स सुरू आहेत. मंगळवारी लेबर लोकांचा पगाराचा दिवस असल्याने त्यांनी सर्व ठिकाणचे पगार दिले. मात्र, बोल्हेगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या साईटवरील वॉचमनचा पगार द्यायचा राहिल्याने फुंदे रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तिथे गेले होते. त्यांनी तेथील वॉचमन दिलीप चंद्रभान पवार यांना बोलावून त्यांच्या पगाराची रोख रक्कम दिली.

​त्यावेळी तिथे वॉचमनचे काही नातेवाईक आलेले होते. त्यातील एकाने फुंदे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. ‘तुम्ही माझ्याकडे कामाला नाही, मी तुम्हाला पैसे का देऊ?’ असे फुंदे यांनी विचारले. या गोष्टीचा राग आल्याने संबंधितांनी फुंदे यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीत आरोपी सागर गोरख मांजरे याने सुबोध फुंदे यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. कुऱ्हाड लागल्याने फुंदे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले.

​फुंदे खाली पडल्यानंतर आरोपी मनोज गोरख मांजरे, करण पवार आणि इतर दोन अनोळखी इसमांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीदरम्यान करण पवार याने मारलेला दगड फुंदे यांच्या डाव्या बाजूच्या बरगडीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. वॉचमन दिलीप पवार यांनी मध्यस्थी करत सुबोध फुंदे यांना आरोपींच्या तावडीतून वाचवले. पोलिसांनी ही माहिती मिळताच तपास सुरू केला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल इखे आणि सहाय्यक फौजदार थोरवे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  २०४७ मध्ये अखंड भारत निर्माण होईल ः विवेक कुलकर्णी

दारूची नशा पडली महागात; माळीवाडा येथून व्यावसायिकाची दुचाकी आणि मोबाईल चोरीला
​अहिल्यानगर – माळीवाडा भागातील संग्राम वाईन्ससमोर एका व्यक्तीला दारूची नशा येऊन झोपणे चांगलेच महागात पडले आहे. ते झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी येथील सुर्यानगर भागात राहणारे सागर नवनाथ गिते हे पान टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सागर गिते हे माळीवाडा येथील संग्राम वाईन्सजवळ आले होते. त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि शेजारी असलेल्या बाकड्यावर बसून दारू पिली. दारूची नशा जास्त झाल्यामुळे सागर गिते यांना तेथेच बाकड्यावर गाढ झोप लागली.

​सकाळी सात वाजेच्या सुमारास जेव्हा सागर गिते यांना जाग आली, तेव्हा त्यांना पार्क केलेली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. त्यांनी भावाला फोन करण्यासाठी खिशात हात घातला असता, त्यांचा मोबाईल फोनही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी आणि मोबाईल मिळून आला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजताच सागर गिते यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

जमिनीच्या वादातून केडगावमध्ये सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी; एक जण गंभीर जखमी
​अहिल्यानगर: केडगाव येथील सोनेवाडी रोडवर असलेल्या लोंढे मळा परिसरात जमिनीच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर शेवटी मारामारीत झाले असून, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​जगन्नाथ कुंडलिक जाधव (वय ४९) यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. जगन्नाथ जाधव आणि त्यांचा मोठा भाऊ मच्छिद्र कुंडलिक जाधव हे केडगावमधील खंडोबा मंदिराजवळ शेजारी-शेजारी राहतात. या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागेवरून वाद सुरू आहे. रविवारी रात्री घराच्या कंपाऊंडजवळील माती उकरण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूने वाद निर्माण झाला.

हे सुद्धा वाचा :  लोहसरच्या यात्रेतील हगामा बंद; आता बैलगाडा व घोड्यांच्या शर्यती

​जगन्नाथ जाधव यांनी त्यांच्या भावाला माती उकरण्यास विरोध केला. याचा राग आल्यामुळे मच्छिद्र जाधव, तसेच धनंजय जाधव आणि धिरज जाधव यांनी मिळून जगन्नाथ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने मच्छिद्र याने खोऱ्याच्या दांडक्याने, धनंजय याने लोखंडी रॉडने तर धिरज याने लाकडी दांडक्याने जगन्नाथ यांच्यावर थेट हल्ला केला. या भीषण मारामारीत जगन्नाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.

​या दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या जगन्नाथ यांच्या पत्नीला देखील आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीने मारहाण केली. ‘पुन्हा जर नडला तर तुला जिवंत सोडणार नाही, जीवे ठार मारून टाकेन’ अशी धमकीही मच्छिद्र जाधव याने आपल्या सख्ख्या भावाला दिली. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले. जखमी जगन्नाथ जाधव यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ