मंत्रालयातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या प्रश्नांच्या सर्वंकष अभ्यासासाठी आणि योग्य तो मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या समितीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधीचाही समावेश करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. तसेच, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण व्हावे आणि शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहोत.
या बैठकीस आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कडले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे रजिस्ट्रार राजेंद्र पाटील, मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.










