अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारसनगर रस्त्यावरील हॉटेल आरवीच्या शेजारी सुरू असलेल्या एका बांधकामाच्या आडोशाला बेकायदेशीरपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 67 हजार 500 रुपयांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य आणि वाहने जप्त केली असून, एकूण 7 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश जबाजी कडले यांनी या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने 13 जुलै रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत बाबासाहेब ज्ञानदेव बेरड, संजय प्रभाकर तडके, भास्कर भानुदास जगधने, संजय रामा भिंगारदिवे, सुधीर डॅनियल शिंदे, महादेव सदाशिव कराळे आणि राजू भिवा मोरे या 7 जणांना जुगार खेळताना आणि खेळविताना अटक करण्यात आली आहे. रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी वाहने असा एकूण 1 लाख 67 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
तरुणीच्या नावे बनावट अकाउंट उघडणे भोवले
अहिल्यानगर : सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या तक्रारीवरून बनावट सोशल मीडिया खाते धारकांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित अज्ञात आरोपीने एका 18 वषय महाविद्यालयीन तरुणीच्या नावाने बनावट खाती तयार करून तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार जून महिन्याच्या 24 तारखेला दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडला होता. एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने पीडित तरुणीचे फोटो चोरून तिचे तीन बनावट खाते प्रोफाइल तयार केले. या बनावट खात्यांवरून तरुणीच्या संमतीशिवाय तिचे वैयक्तिक फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आले.










