शेतपाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करा : आ. पाचपुते
श्रीगोंदे | नगर सह्याद्री
शासनाच्या अधिकृत नकाशामध्ये नोंद असलेल्या शेतपाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत. अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार विक्रम पाचपुते यांनी दिला.
श्रीगोंदे तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विनीत शिरसाट, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आ. पाचपुते म्हणाले की, शासनाच्या अधिकृत नकाशात नमूद असलेले शेतपाणंद रस्ते अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. मात्र, कालांतराने काही ठिकाणी या रस्त्यांवर अतिक्रमणे झाल्याने त्यांची रुंदी कमी झाली असून काही रस्ते पूर्णपणे बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक, कृषी यंत्रसामग्रीची ने-आण तसेच दैनंदिन शेतीकामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे रस्ते पूवपासूनच 10 फूट ते 50 फूट रुंदीचे असून त्यांचे मूळ स्वरूप कायम राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात शेतपाणंद रस्ते खुलीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत सुमारे 120 प्रस्तावित रस्त्यांपैकी 40 रस्ते खुली करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे 54 किलोमीटर लांबीचे रस्ते अतिक्रमणमुक्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या मोहिमेमुळे श्रीगोंदा तालुका शेतपाणंद रस्ते खुलीकरणामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याचा दावा करत, उर्वरित रस्तेही लवकरच मोकळे करण्यात येणार असल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.










