अहिल्यानगर | नगर सह्याद्री
काँग्रेस पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आता तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. पक्षाने संघटन सृजन अभियान अंतर्गत पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचे जाहीर केले होते. अहिल्यानगर जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना दोघांची पुनर्नियुक्ती झाली आहे तर तिसर्या अध्यक्षाची नवीन नियुक्ती झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेसनेही ग्रामीण जिल्ह्याचे विभाजन करत तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी दीप चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर (श्रीरामपूर) व दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील (कर्जत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनी या निवडी जाहीर केल्या.
दीप चव्हाण यापूर्वी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होतेच तर सचिन गुजर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्याचे प्रभारी पद होते. आता ग्रामीणसाठी दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. किरण पाटील पूर्वी कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नियुक्त करण्यात आलेले तिघेही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत.










