पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील शिरापूर येथील रहिवासी, गुरुकुल तालीम आणि सिताई कला, विज्ञान महाविद्यालय, कुरकुंडी (घारगाव)चा विद्याथ पै. नीलेश उचाळे याने पुणे येथे झालेल्या 23 वर्षांखालील वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणीत 82 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत हरियाणातील रोहतक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे.
निवड चाचणीत उचाळेने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत द्वितीय फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतील तिन्ही सामने 10-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकले. नाशिक, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या बलाढ्य मल्लांचा पराभव करून त्याने महाराष्ट्राचा अव्वल मल्ल होण्याचा मान पटकावला.
पै. निलेश उचाळे हा तीन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन, कुमार महाराष्ट्र केसरी आणि युवा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी असून राष्ट्रीय स्तरावरही सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय विजेता ठरला आहे. सध्या तो सिताई कला, विज्ञान महाविद्यालय, कुरकुंडी (घारगाव) येथे शिक्षण घेत असून हरियाणातील रोहतक येथे कुस्तीचे प्रगत प्रशिक्षण घेत आहे.










