- जाहिरात -spot_img
breaking news

तुकाराम मुंडेंचा भेसळ खोरांना दणका! अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; १६ लाखांचा माल जप्त

​नाशिक / नगर सह्याद्री –
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत असून २८ मे पासून आतापर्यंत पंधरा लाख ८९ हजार ५३३ रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात ही कारवाई सुरू आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असून नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात प्रतिबंधित खाद्यपदार्थांची साठवणूक केल्या प्रकरणी तीन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

​ग्राहकांना स्वच्छ, निर्भेळ, दर्जेदार व सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या खाद्यपेढ्यांवर तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. मे. कृष्णा आइसक्रीम मांडसांगवी या पेढीत अनारोग्य पद्धतीने आइसक्रीम व फ्रोझन डेझर्ट या अन्नपदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. या ठिकाणाहून आठ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील मे. महाराष्ट्र चिक्की या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना कार्यरत असल्याचे लक्षात आले. तेथून शेंगदाणा चिक्की हा कमी गुणवत्ता असलेला पदार्थ नमुना तपासणीसाठी ताब्यात घेतला, तसेच १५,२०० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

चांदवड येथील मे. संकेत सुपारी येथे रिफाइंड सोयाबीन ऑइलची खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळले. तेथून २२,२६० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. इगतपुरी येथे मे. सरकार फॅमिली पान शॉप या पेढीतून ५,६२० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. सिन्नर येथील मे. बिन्नर डेअरी, वडाळा येथील मे. न्यू. इच्छामणी फूड प्रॉडक्ट येथून १४,७००, तर मे. रामचंद्र जगदाळे यांच्याकडे राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला खाद्य साठा आढळला. त्यांच्या ताब्यातून तीन लाख ४३,२८२ रुपये किंमतीचा साठा, पेठ येथील अंबिका किराणा व जनरल स्टोअर्स या ठिकाणी तपासणी केली असता २०,८८० रुपये किंमतीचे एनर्जी ड्रिंक, संगमेश्वर येथे नियाज अहमद मोह. सलीम याच्या वाहनातून २,४१८ रुपये किंमतीचा मिश्र दूध साठा जप्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा :  राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, ते आता....

​गिरणारे येथील चंद्रशेखर ट्रेडर्स या ठिकाणी रिफाइंड सोयाबीन तेल, अंदाजे किंमत ७४,६२४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. नाशिक येथे अमित तोडकर यांच्या गोदामात राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थ साठवणूक केलेली आढळली. तेथून चार लाख २६,५८४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संशयितावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पेठ रोड येथील मोती सुपर मार्केट जवळ राज्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ आढळले. तेथून तीन लाख ७५,६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शामसुंदर गुप्ता यांच्या गोदामात पाहणी केली असता नऊ हजार २०८ रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा आढळला. साठा जप्त करत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ​दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. ही तपासणी सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे. नागरिक तसेच ग्राहकांची काही तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सह आयुक्त दि. ज्ञा. तांबोळी यांनी केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ