अकलुज | नगर सह्याद्री
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, तोपर्यंत राज्यात असेच खून आणि अत्याचार होत राहणार आहेत. फडणवीस यांचे काम राक्षसी वृत्तीने सुरू आहे, त्यामुळे हे सरकार उलथवून लावण्याची गरज आहे, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील सोमवारी रात्री अकलूज येथील धनाजी साखळकर यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील आत्याचाराच्या घटनेला मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात ’एसी’ (उ) आणि मोबाईल पुरवले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. हे आरोपी कोणाच्या आशीर्वादाने चैनीत आहेत, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.भाजपच्या तीन राज्यांतील विजयाबाबत जरांगे पाटील यांनी शंका व्यक्त केली. ते म्हणाले यात काहीतरी ’गडबड’ आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव होणे शयच नाही, असे तेथील स्थानिक लोक सांगत आहेत. असे असताना भाजपलाच लोक मतदान कसे काय करतात? यामध्ये नक्कीच काहीतरी काळं-बेरं आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.










