- जाहिरात -spot_img
breaking news

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण; ओमराजे निंबाळकरांना धक्का! सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता…

मुंबई / नगर सह्याद्री –
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल 20 वर्षानंतर देण्यात आला आहे.पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या उपस्थित ही सुनावणी पार पडली. बिहारच्या तुरुंगात असलेला मुख्य शूटर पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा हजर केले. मात्र तो उपस्थित होताच कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयाने निकाल वाचनाला सुरुवात केली. न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी निकालपत्राचे वाचन करताना तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर आणि पोलिसांच्या चुकांवर लक्ष दिले.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकाल वाचनादरम्यान न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. साक्षीदाराने आर्थिक व्यवहार, शूटरला दिलेली रक्कम, शस्त्र खरेदी आणि आरोपींशी झालेल्या भेटींबाबत वेळोवेळी आपली विधाने बदलल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, साक्षीदाराने पद्मसिंह पाटील यांना मलबार हिल येथील बंगल्यात भेटल्याचा दावा केला, मात्र तेथे त्यांचा बंगला नसून कुलाबा येथे फ्लॅट होता. तसेच बिहारमधून शस्त्रे आणल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे किंवा प्रवासाची नोंद उपलब्ध नाही. राकेश मारिया यांच्या संदर्भातील दाव्यांचीही पडताळणी न झाल्याने या साक्षीदाराची साक्ष गृहीत धरण्याजोगी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर नाही
आरोपींनी विविध ठिकाणी रेल्वेने प्रवास केल्याचा दावा तपासात करण्यात आला, मात्र त्यासंदर्भातील कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, आरोपी इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होते, असा दावा करण्यात आला असला तरी त्यासंबंधीही कोणताही विश्वसनीय पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

माफीचा साक्षीदाराच्या जबाबात बऱ्याच तफावती आहेत.दोन कबुली जबाबात बरेच बदल आहेत. माफीच्या साक्षीदाराची अटक, त्याची घेतलेली अवैध कोठडी आणि घेतलेले दोन वेगवेगळे जबाब हे बारकाईने पाहणे कोर्टासाठी महत्वाचे आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. माफीच्या साक्षीदाराने न्यायालयात काही अर्ज दिलेले आहेत. माफीचा साक्षीदार सांगतो की त्याला खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याला आजारपणाची औषध घेऊ दिली नाहीत. घटनेच्या दिवशी तो हजर नव्हता.

हे सुद्धा वाचा :  जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही! तुकाराम मुंढेंचा धडाका! 3 दिवसांत 33 अटक, 27 आस्थापनांना टाळे

न्यायालयाला मोबाईल रेकॉर्डचा पुरावा मिळालेला नाही. साक्षीदाराने वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत त्याला इतर कुठलाही पुरावा नाही.
मोबाईल जप्त होणे अपेक्षित होते पण तपास अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी वारंवार राहिला होता असे सांगण्यात आले मात्र त्याचाही थेट कुठलाही पुरावा किंवा कागद रेकॉर्डवर दिलेला नाही असे निकाल वाचनात कोर्टाने नमूद केले.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालादरम्यान न्यायालयाने माफीचा साक्षीदार पारसमाल जैन याच्या कबुली जबाबाबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. जैन याला 2009 मध्ये क्राईम ब्रांचने ताब्यात घेतल्यानंतर अनेक महिने बेकायदेशीरपणे ठेवण्यात आल्याचा दावा त्याने केला होता.

या संदर्भात सरकारकडे कोणताही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, पारसमाल जैन अटक कसा झाला आणि कोणत्या परिस्थितीत त्याने कबुली जबाब दिला, या सर्व बाबींचा सखोल विचार करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणाचा पायाच ठिसूळ
पवनराजे निंबाळकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचे समोर आल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच पवनराजे यांनी 2003 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र दिल्याचाही उल्लेख करण्यात आला. याशिवाय या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, केवळ त्या साक्षीपुरते मर्यादित न राहता तपासातून समोर आलेल्या इतर पुराव्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. निकाल वाचनादरम्यान न्यायालयाने मागील अनेक न्यायनिर्णयांची उदाहरणेही सांगितली.

20 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची ही थरारक घटना तब्बल २० वर्षांपूर्वी घडली होती. या दोन दशकांच्या काळात या हायप्रोफाइल खटल्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. साक्षीदारांच्या उलटतपासण्या, विविध तांत्रिक याचिका आणि कायदेशीर विलंबाच्या चक्रव्यूहामुळे हा खटला वर्षानुवर्षे रेंगाळत गेला. या प्रकरणात माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण ९ जणांवर हत्येचा कट रचल्याचा आणि अंमलबजावणी केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी आज अखेर निकाल जाहीर करत आरोपींची सुटका करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

हातात मंगळसूत्र घेऊन मी लोकांसमोर उभी राहत होते – अर्चना पाटील
अर्चना पाटील यांनी या काळातील संघर्षाची आठवण सांगताना भावूक होत म्हटलं की, “विरोधक प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित करत होते. आम्ही गावोगावी फिरून लोकांना आमची बाजू समजावून सांगत होतो. हातात मंगळसूत्र घेऊन मी लोकांसमोर उभी राहत होते आणि आम्ही कोणाचाही खून केलेला नाही, हे सांगत होते.” या निकालाने राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या राजकीय आणि कायदेशीर प्रकरणांपैकी एका प्रकरणाचा अध्याय संपला असला, तरी या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

17 वर्षे राजकीय षडयंत्र सहन केले
राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले की, दुर्दैवाने पद्मसिंह पाटील यांना कोर्टात नेमकं काय झालं, याबाबत मी सांगू शकणार नाही आणि त्यांना ते समजणार देखील नाही. पण ही परिस्थिती कशामुळे उद्भवली, हे षड्यंत्र कोणी, कशामुळे केले, यात कोण कोण प्यादे होते? पद्मसिंह पाटील हे 1990 च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते, असा त्यांना शब्द दिला होता. काही कारणाने ते होऊ शकले नाही. 2009 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते, या काळात कॅबिनेटचा विस्तार होणार होता, बरोबर तेव्हाच काही लोकांनी याबाबतीत एका वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला, षडयंत्र रचले गेले. ते आज कोर्टाच्या माध्यमातून आमच्या देखील लक्षात आलेले आहे. आता प्रत्यक्षात कोर्टाची ऑर्डर उपलब्ध झाल्यानंतर, त्याचे वाचन केल्यानंतर मी याबाबत सविस्तर बोलू शकेल. पण न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला.

योग्य वेळेस गरजेनुसार मी बोलेल
इतके दिवस आम्ही कोणी काहीच बोललो नाही, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. बरेच जण याचा राजकीय फायदा घेत होते, अतिशय खोटी विधाने करत होते. परंतु मी तेव्हा काहीच बोललो नाही; योग्य वेळेस गरजेनुसार मी बोलेल,” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.

हा निकाल दुदैवी ः खा. ओमराज निंबाळकर
हा निकाल दुर्दैवी आहे. कारण वीस वर्षांपासून आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी अखंडपणे आम्ही आणि तपास यंत्रणा प्रयत्न करत होत्या. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. माननीय कोर्टाच्या निकालावर भाष्य करण्यापेक्षा हायकोर्टात अपील करुन त्यांना सगळ्या गोष्टी पटवून देणं, हे महत्त्वाचे आहे असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा :  विचित्र अपघातात ११ प्रवाशांचा करुण अंत, कुठे घडला अपघात पहा...

हत्याकांडाचा घटनाक्रम…
* 03 जून 2006 रोजी मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार.. * चालक समद काझी यांचाही मृत्यू… * दोन अज्ञात हल्लेखोरांनी केला होता पाठलाग करून हल्ला.. * राजकीय वैरातून 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा दावा… * 2009 मध्ये सीबीआय कडून पद्मसिंह पाटील अटक…* पद्मसिंह पाटील सप्टेंबर 2009 पासून जामिनावर बाहेर, * तब्येतीच्या कारणास्तव मिळाला होता जामीन..

पवनराजे निंबाळकर यांची कशी झाली होती हत्या
काँग्रेसचे नेते असलेल्या पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी हत्या करण्यात आली होती. पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे त्यांची मोटार अडवून बेछूट गोळीबार करण्यात आला होता. त्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या कारचा चालक समद काझी याचा मृत्यू झाला होता. पवनराजे यांचे राजकीय प्रतिस्पध असलेल्या पद्मसिंह पाटील यांनी सुपारी देऊन त्यांची हत्या घडवल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकरणात त्यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर या फिर्यादी आहेत.

हे आरोपी निर्दोष सुटले
पद्ममसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ल, शशिकांत कुलकण, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटे पांडे,

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ