- जाहिरात -spot_img
breaking news

कर्डिले की मोकाटे?

राहुरी पोटनिवडणुकीसाठी ५६.२० टक्के मतदान | मतदानाची टक्केवारी घसरली, ४ मे रोजी मतमोजणी
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अपेक्षित चुरस न दिसल्याने तसेच उन्हाची तीव्रता देखील अधिक प्रमाणात असल्याने त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून आले असून, एकूण सुमारे ५६.२० टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकांचा विचार करता या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीचा आकडा घसरल्याचे दिसून आले.

दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी सत्ताधारी पक्षाने पूर्ण ताकद लावली असताना विरोधकांकडून तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मतदारसंघात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार असून, सकाळपासूनच मतदानाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के म्हणजे ६० हजार ७८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १ वाजेपर्यंत ही टक्केवारी २९.६० (९८,७४० मतदार) इतकी झाली. मात्र, त्यानंतर वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाचा वेग मंदावला. दुपारी ३ वाजेपर्यंत अवघे ३९.६५ टक्के (१,३२,२५५) मतदान झाले होते. सायंकाळी चारनंतर उन्हाची तीव्रता कमी होताच मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रांकडे गर्दी केली. त्यामुळे अंतिम टप्प्यात मतदानात वाढ झाली आणि पाच वाजेपर्यंत ५०.७४ टक्के म्हणजे १ लाख ६९ हजार २४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची अधिकृत माहिती मिळाली. त्यानंतर अंतिम आकडेवारीनुसार एकूण ५६.२० टक्के मतदान पार पडले असून यात एकूण १८७४६३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रचारासाठी जिल्ह्याबाहेरील मोठ्या नेत्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा अपवाद वगळता जिल्ह्याबाहेरील प्रमुख नेते प्रचारात सहभागी न झाल्याने पक्षाने निवडणुकीकडे दुर्लक्ष करत गांभीर्याने पाहिले नसल्याची चर्चा रंगली.

विरोधकांचे बूथ लागले नाहीत
पाथर्डी तालुयासह अनेक ठिकाणी भाजप व्यतिरिक्त विरोधकांचे बूथही दिसून आले नाहीत. परिणामी मतदान केंद्रांवर भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे चित्र होते, तर विरोधी गटाचे कार्यकर्ते काहीसे हतबल दिसून आले. भाजप कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर दिसणारा आत्मविश्वास आणि विरोधकांतील कमी उत्साह यामुळे निकालाबाबतचे संकेत स्पष्ट होत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मतदान प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसह महिला व युवा वर्गाने देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा :  बंद घर फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास; हात उसने पैसे परत मागितल्याने तरुणाला बेदम मारहाण

प्राजक्त तनपुरेंची भूमिका गुलदस्त्यातच
राहुरी येथे सकाळी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईडीच्या निकालाचा व निवडणुकीचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असून भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ