एमआयडीसी परिसरात खळबळ : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेवर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण दत्तात्रय गुंड (रा. गुंड वस्ती, शेंडी, ता. जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित महिलेशी ओळख वाढवून, तिच्याशी जवळीक निर्माण केली. आपले तिच्यावर प्रेम असल्याचे भासवून आरोपीने गेल्या सहा महिन्यांत वेळोवेळी महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पती आणि मुलांना मारून टाकण्याची धमकीही आरोपीने महिलेला दिली होती.
आरोपीच्या या सततच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडितेने राहत्या घरी जंतुनाशक औषध पिऊन जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रविण गुंड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोढे हे करीत आहेत.
बकऱ्यांच्या पैशांवरून वाद; लोखंडी रॉडने पती-पत्नीला बेदम मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: अहिल्यानगर जवळील भिंगार येथील डेअरी फार्म भागात बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीच्या पैशांच्या कारणावरून एका जोडप्याला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार येथील कॅम्प पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र जास काळे (वय ३५ वर्षे, रा. बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर) हे शेळीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी आरोपींना बकऱ्या विकल्या होत्या. याच विकलेल्या बकऱ्यांचे हक्काचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला. फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकांच्या घरासमोर थांबलेले असताना, आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठले.
यावेळी आरोपी फिकु उर्फ हयदास खीपावत काळे, ताज्या पाच्या भोसले, केशव ताज्या भोसले, रुपेश ताज्या भोसले आणि सुरेश फिकावत काळे (सर्व राहणार डेअरी फार्म, भिंगार, अहिल्यानगर) यांनी पैशांच्या कारणावरून फिर्यादी महेंद्र काळे आणि त्यांच्या पत्नीला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीवर लोखंडी रॉडने भीषण हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पती आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
घटनेनंतर जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि जखमींच्या जबाबावरून कॅम्प पोलिसांनी तत्परतेने गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. बी. अकोलकर आणि पोलीस हवालदार मिसाळ करत आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.










