बीड / नगर सह्याद्री –
बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला नदीपात्रात भीषण अपघात झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास ५० ते ६० भाविक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक बोट चालकांकडून आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. काही भाविकांना बाहेर काढण्यात यश आले असून शोध सुरू आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सध्या पवित्र अधिक मासानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील गोदावरी नदीपात्रातून भाविकांना बोटीच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो. मात्र, अधिक पैशांच्या हव्यासापोटी बोट चालकांकडून बोटीमध्ये अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
याच निष्काळजीपणामुळे आज भाविकांची बोट नदीपात्रात उलटून मोठा अपघात झाल्याचा आरोप केला जातोय. आतापर्यंत २० भाविकांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात यश आले आह. इतरांसाठी रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य) अजूनही सुरू आहे. या दुर्घटनेत काही लहान मुले बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात अत्यंत गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोटीत अंदाजे ६० जण होते, त्यामधील २० जणांना वाचण्यात यश आले आहे. इतरांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.










