युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जाण्याचा आरोप
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यासाठी कट रचला जात असल्याचा दावा करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेत जोरदार निवेदन सादर केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती तपासली जाईल तसेच विनाकारण कोणालाही त्रास दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, नगरसेवक दत्तात्रय कावरे, अभिषेक भोसले आदी उपस्थित होते.
एमआयडीसी परिसरात कंत्राटदार म्हणून काम करणारा चिरंजीव दत्तात्रय गाढवे हा विविध कंपन्यांतील अधिकारी व सुपरवायझर यांना धमकावून त्रास देत असून, त्याच्यावर खंडणी व धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सनफार्मा चौकात गाढवे याने गाडी आडवी घालत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गलांडे यांनी केला असून त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वतःवरील गुन्हे मागे घेण्यासाठी गाढवे हा सातत्याने खोट्या घटना सांगून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गलांडे यांनी केला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कथित घटनांबाबत कोणतीही सत्यता आढळून न आल्याने कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. दि. १७ मे २०२६ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे देखील खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये त्यांच्यासह मुलगा, पुतण्या, भाऊ आणि शंकर शेळके यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. दि. २४ मे रोजी घडलेल्या घटनेतही संबंध नसताना मुद्दाम नाव घेतल्याचा आरोप गलांडे यांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार ब्लॅकमेल करण्यासाठी तसेच स्वतःविरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी रचला गेल्याचा आरोप निवेदनात केला आहे. खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.










