मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सकाळी विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी तातडीने विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ६ वाजून ५७ मिनिटांनी हा धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये केवळ विधानभवनच नव्हे, तर मुंबईतील आणखी चार महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. यात शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि एका बँकेचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (Bomb Disposal Squad) तसेच पोलिसांनी विधानभवन परिसरात कसून तपास सुरू केला आहे. परिसरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बॉम्ब आणि मिसाईल हल्ल्याची धमकी देणारा मेल आला आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून सर्व ठिकाणी सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेवर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उबाठा गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधानभवनातील आजचे कामकाज स्थगित करून संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली. तसेच पोलीस यंत्रणेवरील ताण लक्षात घेता अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवण्याची विनंती त्यांनी केली.
तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. ही धमकी केवळ भीती निर्माण करण्यासाठी दिली आहे की त्यामागे गंभीर कट आहे, हे शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या पोलिसांकडून धमकीच्या ई-मेलचा स्रोत शोधण्याचे काम सुरू असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.










