अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर असलेल्या अभिषेक बाळासाहेब कळमकर (वय 35) यांच्याविरुद्ध न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट जारी केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 4 थे न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, अहमदनगर यांनी हा आदेश देत अभिषेक कळमकर यांना तातडीने अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश MIDC पोलीस ठाण्याला दिले आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी तरुणीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्यापपर्यंत आरोपीला अटक न झाल्याने फिर्यादीचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. याबाबत त्यांनी एसपी यांच्याकडे धाव घेतली होती.
गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. डिजिटल स्वरूपातील गुन्ह्यांचाही यात समावेश आहे. दि. 4 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. संबंधित व्यक्ती न्यायालयीन प्रक्रियेस अनुपस्थित राहिल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आदेशानुसार, पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेणे आणि न्यायालयात हजर करणे बंधनकारक आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांना अटक वॉरंट निघाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शहरात विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










