पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या टाकळी ढोकेश्वर येथे उपबाजार समितीचा अनेक दिवसांपासून जागेच्या मुद्द्यावरून सुरू असलेला स्थानिकांचा विरोध आता मावळल्याचे चित्र असून, ग्रामस्थांनीही उपबाजार समितीच्या उभारणीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
टाकळी ढोकेश्वर ही नगर-कल्याण महामार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ असून परिसरातील सुमारे 50 गावांतील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांचा दररोज या ठिकाणी संपर्क येतो. त्यामुळे या ठिकाणी उपबाजार समिती झाल्यास उत्तर भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कृषी मालाच्या खरेदी-विक्रीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
म्हसोबा झाप, पोखरी, शिक्री, पळशी, खडकवाडी हा परिसर टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कांदा तसेच वाटाणा उत्पादनात सुद्धा पारनेर तालुक्याचा उत्तर भाग हा अग्रेसर आहे. तसेच वासुंदे, वडगाव सावताळ, वनकुटे, ढवळपुरी आदी भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि मिरचीचे उत्पादन घेतले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन होत असतानाही शेतकऱ्यांना दूरवर बाजारपेठ गाठावी लागते. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर येथे उपबाजार समितीची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
उपबाजार समितीसाठी नगर-कल्याण महामार्गालगतचा सरकारी गट क्रमांक 962 आणि वासुंदे रस्त्यालगतचा गट क्रमांक 1011 हे पर्याय चर्चेत आहेत. गट क्रमांक 1011 मध्ये उपबाजार समितीसाठी ग्रामस्थांनी एकमताने हिरवा कंदील दिल्याचे सांगितले जात आहे. तर गट क्रमांक 962 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने त्या जागेची मोजणी करून अतिक्रमण हटवून सरकारी क्षेत्र सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर हे उपबाजार समितीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांना या भागाच्या शेती, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास असल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला टाकळी ढोकेश्वर उपबाजार समितीचा प्रश्न आता लवकरात लवकर माग लागावा, अशी एकमुखी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सरकारी गट 1011 हा तसा मध्यवत ठिकाणी असलेला गट आहे. दळणवळणासाठी सुद्धा योग्य गट असल्याने या ठिकाणी बाजार समिती व्हावी, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. या भागाच्या प्रगतीला चालना मिळेल. उपबाजार समितीला टाकळी ढोकेश्वर परिसरात कोणाचाही विरोध नाही.
– किसनराव धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते
शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने विचार केला असता बाजार समितीसाठी 1011 हा गट योग्य आहे. 962 हा गट नगर- कल्याण हायवे वरती असल्याने पुढील टाकळी ढोकेश्वर गावची वाढती बाजारपेठ व विस्तार पाहता राखीव क्षेत्र असणे गरजेचे आहे. नगर-कल्याण हायवे लगत क्षेत्र हे भविष्यात येथे बगीचा, क्रीडांगण इतर भौतिक सुविधा निर्माण करता येतील.
– शिवाजी खिलारी, माजी सरपंच
टाकळी ढोकेश्वर येथे उपबाजार समिती झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. वासुंदे रोडलगत असलेला 1011 हा गट बाजार समितीच्या जागेसाठी योग्य आणि सुरक्षित आहे. गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असल्याने या भागात बाजार समिती झाल्यास शेतकऱ्यांना सुद्धा दळणवळणासाठी योग्य जागा उपलब्ध होईल.
-नारायण झावरे, चेअरमन सेवा सोसायटी










