मुंबई / नगर सह्याद्री –
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, चित्रपट निर्माती आणि उद्योजिका अशा विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली प्राजक्ता आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मराठी मालिकांपासून ते वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारत प्राजक्तानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळं आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळं ती घराघरांत लोकप्रिय झाली. आता ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी सज्ज असल्यानं चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताच्या आगामी तेलुगू चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे व तो ह्याच वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा, कलाकारांची फळी आणि प्राजक्ताची भूमिका याविषयीची अधिक माहिती लवकरच आपल्यासमोर येईल, असं प्राजक्ता म्हणाली. त्यामुळं या प्रोजेक्टबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्राजक्ता या चित्रपटात नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल आणि ती कोणत्या कलाकारांसोबत झळकणार, याबाबत चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. मराठी मनोरंजन विश्वात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता तेलुगू चित्रपटसृष्टीतील तिच्या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्राजक्ताच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तिनं वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिॲलिटी शोमधून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. मात्र, तिला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती छोट्या पडद्यावरील मालिकांमुळं. २०११ मध्ये ‘सुवासिनी’ या मालिकेतून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील ‘मेघना देसाई’ या भूमिकेनं तिला महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचवलं. या मालिकेतील तिच्या साध्या, सोज्वळ अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली.
प्राजक्ता माळीच्या फिल्मी करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे तिचे निर्मिती क्षेत्रातील पदार्पण. केवळ अभिनेत्री म्हणून न थांबता तिनं चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवलं. तिची निर्मिती असलेला आणि मुख्य भूमिका असलेला ऐतिहासिक चित्रपट ‘फुलवंती’ बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत राहिला. एका सुप्रसिद्ध नर्तकीचे पात्र पडद्यावर जिवंत करत तिनं आपल्या भरतनाट्यमच्या कौशल्याचा पुरेपूर वापर केला आणि चित्रपट यशस्वी करून दाखवला.










