एकाच सत्रात काम करण्याची ठाम मागणी; ९ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा / उन्हाळ्यात दुपारच्या कामामुळे जीवितास धोका – युनियनचा गंभीर आक्षेप
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील दैनंदिन साफसफाईचे काम दोन सत्रांमध्ये करण्याचा घेतलेला निर्णय मनपा कर्मचारी युनियनने धुडकावून लावला असून, एकाच सत्रात कामकाज सुरू ठेवण्याची ठाम मागणी करत आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास गुरुवार दि. ९ एप्रिलपासून आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा युनियनने अध्यक्ष जितेंद्र सारसर व सचिव आनंद वायकर यांनी निवेदनाद्वारे आयुक्त यशवंत डांगे यांना दिला आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दि. १ एप्रिल २०२६ पासून शहरातील साफसफाईचे कामकाज दोन सत्रांमध्ये – सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, युनियनच्या मते हा निर्णय प्रत्यक्ष परिस्थितीला धरून नसून कामगारांसाठी अत्यंत गैरसोयीचा आहे. अनेक वर्षांपासून एकाच सत्रात साफसफाईचे काम सुरळीत सुरू असताना अचानक दोन सत्रांचा निर्णय घेणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
युनियनचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, बहुतांश सफाई कामगारांना पहाटे ५ वाजताच घरातून निघावे लागते. वाहतूक सुविधेअभावी अनेकांना पायीच हजेरीवर यावे लागते. एका फेरीसाठी सुमारे एक तासाचा प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत सकाळी काम करून पुन्हा दुपारी हजेरी लावणे कामगारांसाठी अत्यंत कष्टदायक ठरत आहे.
याशिवाय सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून दुपारच्या वेळेत प्रचंड उष्णतेचा तडाखा जाणवतो. दुपारी १२ नंतर नागरिकही घराबाहेर पडत नाहीत, अशा वेळी सफाई कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे त्यांच्या आरोग्यास घातक ठरू शकते. उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाचा निर्णय हा कामगारांच्या जीविताशी खेळ करणारा असल्याचा गंभीर आरोप युनियनने केला आहे.
दरम्यान, यापूर्वी युनियनच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अडचणी मांडल्या होत्या. उपायुक्त (कर) व अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून एकाच सत्रात साफसफाईचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा ९ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मनपा कर्मचारी युनियनकडून देण्यात आला आहे.










