शिर्डी / नगर सह्याद्री –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सहा खासदार फुटून शिंदेंकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदान संघात सभांचा धडका लावला आहे. आज उद्धव ठाकरे शिर्डीतील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर हल्लाबोल करण्यासाठी शिर्डीत सभा घेत आहे. या सभेत संजय राऊत यांनी गद्दार दिसला की ऑपरेशन तुडवा सुरू करा असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे.
शिर्डीत संजय राऊत भाषणाची सुरूवात करत असताना खालून सौ दाऊद एक राऊत अशा घोषणा सुरू झाल्या, त्यावर राऊत हसून म्हणाले, साईबाबांच्या शिर्डीत तरी दाऊदच नाव घेऊ नका. त्यानंतर त्या गद्दार खासदाराचं काय काय करायचं काय अशा घोषणा सुरू झाल्या. त्यानंतर राऊत म्हणाले, त्या गद्दार खासदाराचं काही करू नका, रस्त्यात दिसल्यावर ऑपरेशन तुडवा सुरू करा. काय सोप्पं आहे. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला.
मुस्लिम शिवसैनिकाचे लक्षवेधी बॅनर
यावेळी शिर्डीच्या सभेत निष्ठावंत मुस्लीम शिवसैनिक उपस्थित होते, त्यांच्या हातातील बॅनर संजय राऊत यांनी वाचून दाखवले. गद्दारांनो निष्ठा विकल्या जात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढाईच्या शेवटच्या घावा पर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहू अशा आशयाचे बॅनर निष्ठावंत मुस्लिम शिवसैनिकांनी झळकावले होते. त्याचं राऊतांनी कौतुक केले. ही फक्त त्या मावळ्याची भावना नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांची भावना आहे, असे राऊत म्हणाले.
खासदारने घेतली तीन वेळा साईबाबांची शपथ
राऊत म्हणाले, इकडचा खासदार एक नंबरचा बदमाश माणूस… एकदा गद्दारी केली त्याला शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला. परत आला उद्धव ठाकरे आणि शिर्डीकर यांची माफी मागितली. आणि पुन्हा एकदा १०० कोटीला विकला गेला. अरे साईबाबांची शपथ घेतली या खासदाराने, चार दिवसांपूर्वी बैठकीला उद्धव साहेबांनी विचारले, भाऊसाहेब तुमच्याबद्दल असं बोललं जातं. हे महाशय चिडून उठले आणि तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली. साहेब मी निष्ठावंत आहे. मरेपर्यंत तुमच्यासोबत राहिल, मग आता कुठे गेलाय मरायला. असा टोलाही राऊत यांनी लगावला.
एक रुपया खर्च न करता खासदार
खासदारकी हे चांगला धंदा सुरू झाला आहे. हा खासदार एक रुपया खर्च न करता खासदार झाला. खर्च पक्षाने केला, मेहनत लाखो शिवसैनिकांनी केली आणि मत उद्धव साहेबांना मानणाऱ्या मतदारांनी दिलीत. एकही रुपया न खर्च करता हा खासदार झाला आणि आणि १०० कोटींना विकला गेला. हा धंदा है लेकिन गंदा है, पण याची किंमत तुम्हांला चुकवावी लागेल.
राऊत म्हणाले, शिर्डीच्या शिवसैनिकांनी एक मोहीम सुरू केली आहे, गावोगावी भीकेच्या झोळ्या घेऊन जाणार आहेत, आणि या खासदाराला भीक लागली आहे, त्यासाठी भीक गोळा करून त्याला देणार असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.










