पारनेर | नगर सह्याद्री
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील श्री ढोकेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या थकीत कर्ज वसुली प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने संस्थेच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. थकीत कर्जदार विजयकुमार बन्सीलाल गांधी यांनी दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळून लावल्याने संस्थेच्या वसुली कारवाईला कायदेशीर बळ मिळाले आहे.
संस्थेकडून संबंधित कर्जदाराविरुद्ध थकीत कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली होती. संस्थेला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम 101 अंतर्गत वसुली दाखला प्राप्त झाल्यानंतर कलम 156 अन्वये तारण व विनातारण मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. जप्त मालमत्तेचा लिलाव रोखण्यासाठी संबंधित कर्जदारांनी सहकारी न्यायालय, अहिल्यानगर येथे लवाद दावा क्र. 131/2025 दाखल करून मनाई हुकूमाची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
यानंतर कर्जदारांनी सहकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दावा क्र. 5/2026 दाखल केला. या अपीलाची सुनावणी झाल्यानंतर खंडपीठानेही कर्जदारांचे अपील नामंजूर केले.
संस्थेच्यावतीने या प्रकरणात ॲड. कृष्णा पंडितराव झावरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. निकालानंतर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब किसन लोंढे यांनी समाधान व्यक्त करत हा निर्णय थकीत कर्जदारांसाठी धडा ठरणारा असल्याचे सांगितले. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण आणि त्यांना वेळेत ठेवी परत मिळाव्यात, यासाठी संस्था कायदेशीर मार्गाने वसुलीची कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे ही संस्थेची जबाबदारी
या निकालामुळे सहकारी संस्थांच्या कायदेशीर वसुली प्रक्रियेला बळ मिळाले आहे. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे ही संस्थेची जबाबदारी आहे. कर्जदारांनी वेळेत परतफेड करावी, ही अपेक्षा असते. न्यायालयाच्या निर्णयामुळे वसुलीला विलंब करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल आणि आर्थिक शिस्तीसह सहकार क्षेत्रावरील विश्वास अधिक दृढ होईल.
– भाऊसाहेब लोंढे, चेअरमन, श्री ढोकेश्वर पतसंस्था,










